२ लाखांची लाच घेताना 'ईपीएफओ' विभागीय आयुक्तासह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
By अझहर शेख | Published: December 28, 2023 10:44 PM2023-12-28T22:44:49+5:302023-12-28T22:44:57+5:30
नाशिकच्या कार्यालयात सापळा
नाशिक : येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील विभागीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त संशयित गणेश प्रसाद आरोटे यांच्यासह भविष्य निर्वाह अधिकारी संशयित अजय आहुजा आणि खासगी सल्लागार संशयित मंगलकर यांना दोन लाख रूपयांची लाच तक्रारदाराकडून स्वीकारल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण पथकाने (सीबीआय) रंगेहात ताब्यात घेतले. त्यांना नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्याालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली.
नाशिक येथील बांधकाम क्षेत्रातील एका तक्रारदार उद्योजकाकडून गुन्हे अन्वेषण विभागाच्या मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाला येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील लाचेच्या मागणीप्रकरणी शनिवारी (दि.२३) लेखी तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीत संशयित ईपीएफओ अधिकारी अजय आहुजा व सल्लागार मंगलकर यांच्या विरोधात २ लाख रूपये लाचेची मागणी केल्याचे म्हटले होते. गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयाकडून तक्रारीची शहनिशा करण्यात आली.
यानंतर सीबीआय चे उपमहानिरीक्षक डॉ.सदानंद दाते यांच्या आदेशानुसार नाशिकच्या सातपुर येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयात सीबीआय मुंबई व नाशिकच्या पथकाने संयुक्तिक सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून संशयित मंगलकर याने २ लाख रूपये स्वीकारले असता पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्याने संशयित आरोटे व आहुजा यांच्या सांगण्यावरून लाचेची रक्कम घेतल्याची माहिती दिल्यानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संशयित गणेश आरोटे, अजय आहुजा यांनाही अटक केली. या तीघांना जिल्हा व सत्र न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत तीघांना येत्या १ जानेवारी २०२४पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.