सीसीटीव्हीमुळे चोरटा गजाआड : चार हजाराची रोकड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:11 AM2018-08-26T00:11:01+5:302018-08-26T00:11:25+5:30
डीजीपीनगर, बोधलेनगर येथील श्री साई मंदिरातील दानपेटीसह १२ हजार रुपयांची रोकड चोरून नेणाऱ्या चोरट्यास चार दिवसांत उपनगर पोलिसांनी रोटरी क्लबच्या वतीने लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने गजाआड केले.
नाशिकरोड : डीजीपीनगर, बोधलेनगर येथील श्री साई मंदिरातील दानपेटीसह १२ हजार रुपयांची रोकड चोरून नेणाऱ्या चोरट्यास चार दिवसांत उपनगर पोलिसांनी रोटरी क्लबच्या वतीने लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने गजाआड केले. चोरट्याकडून चार हजाराची रोकड जप्त करण्यात आली असून, त्याचा एक साथीदार मात्र अद्याप फरार आहे. साई मंदिरात गेल्या मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्याने चोरी करून दोन्ही मंदिरांतील दानपेटी, पितळी थाळी चोरून नेली होती. बुधवारी सकाळी मंदिरात चोरी झाल्याचे निदर्शनास येताच या घटनेची माहिती उपनगर पोलिसांना देण्यात आली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते व त्यांच्या सहकाºयांनी दोन्ही मंदिरांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी रोटरी क्लबच्या वतीने मंदिर व आजूबाजूच्या सोसायटी परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमºयाच्या फुटेजवरून पोलिसांना चोरट्याची ओळख पटविणे सोपे झाले. त्या सीसीटीव्ही कॅमेºयाच्या फुटेजवरून पोलिसांनी संशयित सूरज दिलीप बागुल (२४, रा. ब्रिजनगर, जेलरोड) यास अटक केली असून, त्याच्याकडून दोन्ही मंदिरांतून चोरलेल्या चिल्लर व रोकडपैकी चार हजार रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. संशयित सूरज याला न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवस पोलीस कोठडी देण्यात आली. रोटरी क्लबच्या वतीने नाशिकरोड परिसरात ५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने गैरप्रकाराला आळा बसला आहे. सीसीटीव्ही कॅमेºयाचे फुटेज डीव्हीआरमध्ये संग्रहित होते. रोटरीने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाचे काही ठिकाणचे डीव्हीआर हे बंद करून ठेवले जात असल्याने त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे डीव्हीआर बंद करू नये, असे आवाहन कौसर आझाद यांनी केले आहे.