सिडकोत मिरवणुकीवर सीसीटीव्हीची नजर
By admin | Published: September 8, 2014 12:48 AM2014-09-08T00:48:01+5:302014-09-08T00:56:59+5:30
सिडकोत मिरवणुकीवर सीसीटीव्हीची नजर
सिडको : गेल्या दहा दिवसांपासून विराजमान झालेल्या श्री गणरायास निरोप देण्यासाठी सार्वजनिक मंडळे सज्ज झाली आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अंबड पोलिसांचा फौजफाटा सज्ज झाला असून, मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी सिडको भागातून चार मंडळांनी सहभाग नोंदविला असून, बहुतांशी मंडळांकडून जागच्या जागी मिरवणूक काढण्यात येते. यंदाच्या वर्षी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत लहान-मोठे मिळून १२० सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग नोंदविला आहे. मुख्य मिरवणूक उत्तमनगर, पवननगर, सावतानगर, दिव्य अॅडलॅब मार्गे आयटीआय पूल गणेश घाट असा असून, यात ओम गुरुदेव मित्रमंडळ, राजगड मित्रमंडळ, शांती विनायक मित्रमंडळ, इच्छापूर्ती मित्रमंडळांनी सहभाग नोंदविला आहे. मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून, यासाठी दोन पोलीस निरीक्षक, ११ पोलीस उपनिरीक्षक, १२० पोलीस कर्मचारी, २० होमगार्ड, १० महिला होमगार्ड आदिंचा बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी दिली. गणेश विसर्जन घाटावर मोठा बंदोबस्त असणार आहे. तसेच सुरक्षारक्षक, जीवरक्षक यांचादेखील सहभाग राहणार आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त संदीप दिवाण, सहायक पोलीस आयुक्त पंकज डहाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, किशोर सूर्यवंशी, भोई यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. नाशिकरोड त्याचप्रमाणे शहरातील मिरवणूक मार्गांवरदेखील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे. पोलिसांकडून व्हिडीओ चित्रीकरणदेखील केले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)