विंचूरच्या शाळेवर सीसीटीव्हीची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 04:33 PM2019-01-18T16:33:50+5:302019-01-18T16:34:01+5:30
सुरक्षिततेचा उपाय : पालकवर्गाकडून समाधान व्यक्त
विंचूर : येथील कर्मवीर विद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, शाळेचा सर्व परिसर आता कॅमेरेच्या नजरेखाली आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून शालेय प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे पालकवर्गांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे सक्तीचे करण्यात येणार असल्याचे शिक्षणविभागाकडून वारंवार सांगण्यात येत असले तरी अनेक शाळा अद्याप सीसीटीव्हीच्या टप्प्यात आलेल्या नाहीत. येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सुमारे अडीच हजाराच्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अकरावी व बारावीच्या प्रत्येकी दोन तुकड्या असल्याने तसेच शाळा परिसरही मोठा असल्याने शाळेत सीसीटीव्ही बसविण्याची पालकांची जुनी मागणी होती. शाळेच्या पुढील व काही मागील परिसरात सुमारे सोळा कॅमेरे बसविल्याने टवाळखोरांच्या सर्व हालचाली कॅमेऱ्यात कैद होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे रात्रीच्या सुमारास शाळाबाह्य मुलांकडुन होणा-या गैरप्रकारांना आता आळा बसणार आहे. विद्यालयाची भव्य अशी दुमजली इमारत असून, पाचवी ते बारावी वर्गांमध्ये सुमारे 40 तुकड्यांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्राचार्य जी.जी.पोफळे यांच्या कार्यालयात कॅमे-यातील सर्व चित्रण दिसणार आहे. परिणामी वर्ग सोडुन आवारात फिरणा-यांना चाप बसणार आहे.