सीसीटीव्ही फुटेज व्हायरल : तीन वर्षाच्या चिमुकल्याच्या कानशिलात शिक्षिकेने भडकावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 04:49 PM2019-03-09T16:49:04+5:302019-03-09T16:49:48+5:30
गंगापूररोडवरील या शाळेतदेखील असाच प्रकार शुक्रवारी (दि.८) घडला. शिक्षिकेकडून चिमुकल्याला दोन्ही हातांनी कानशिलात केली जाणारी मारहाण वर्गामध्ये असलेला ‘तीसऱ्या डोळ्या’त कैद झाली.
नाशिक : अक्षरओळख शिकत असताना गंगापूररोडवरील एका प्ले-ग्रूपच्या शाळेत तरूण महिला शिक्षकाने अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकल्याच्या कानशिलात भडकावल्याच्या गंभीर प्रकार सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ सोशलमिडियातून व्हायरल झाल्यानंतर उघडकीस आला. यानंतर संस्थाचालकांनी तडकाफडकी त्या शिक्षिकेला निलंबीत केले आहे.
बालवयातच आपल्या मुलांना अक्षरओळख व्हावी, जेणेकरून त्यांची बुध्दी तल्लख होऊन अभ्यासात अभीरूची वाढेल आणि शाळेचा गोडवा निर्माण होईल, या उद्देशाने पालक मुलांना लहान वयातच बालवाडी, अंगणवाडी, प्ले-ग्रूप, नर्सरी या लहान गटांच्या शाळेत दाखल करतात. या वयात मुलांना गोडीगोडीने अक्षर ओळख करून त्यांच्याशी मिसळून अक्षर ओळख करून देण्याचा प्रयत्न शिक्षकांकडून केला जातो; मात्र अनेकदा काही शिक्षकांचा स्वत:वरील ताबा सुटतो आणि अन्य रागाच्या भरात चिमुकल्यांवर त्यांच्याकडून आघात केला जातो, अशा घटना यापुर्वीदेखील घडल्या आहे. यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. गंगापूररोडवरील या शाळेतदेखील असाच प्रकार शुक्रवारी (दि.८) घडला. शिक्षिकेकडून चिमुकल्याला दोन्ही हातांनी कानशिलात केली जाणारी मारहाण वर्गामध्ये असलेला ‘तीसऱ्या डोळ्या’त कैद झाली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ सोशलमिडियावरूच चांगलाच गाजला. चिमुकल्याच्या पालकांनी शाळेत धाव घेऊन संबंधित शिक्षिका व संस्थाचालकांना याप्रकरणी जाब विचारला. संस्थाचालकांसह त्या शिक्षिकेनेही चूक मान्य करत त्यांची माफी मागितली. दरम्यान, चिमुकल्याच्या मातेचे हृदय हा सर्व प्रकार बघून हेलावले व त्यांनी थेट गंगापूर पोलीस ठाणे गाठले. शिक्षिका तरूण असल्यामुळे भवितव्याचा विचार करत त्यांनी तोंडी तक्रार पोलिसांकडे केली; मात्र लेखी तक्रार करण्यास नकार देत संबंधितांना ‘खाकी’ने समज द्यावी, अशी इच्छा बोलून दाखविली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरिक्षक किशोरकुमार मोरे यांनी शिक्षिकेसह संस्थाचालकांना बोलावून घेत पोलीस ठाण्यात समज दिली. या घटनेनंतर संस्थाचालकाने त्या शिक्षिकेला निलंबीत केल्याचेही स्पष्टीकरण यावेळी देण्यात आल्याने घटनेवर पडदा पडला.
---
लहान मुलांविषयी संवदेनशीलता हवीच
लहान गटांच्या शाळेत जेव्हा नोकरी करतो तेव्हा शिक्षकांनी त्यांच्याविषयी अत्यंत संवेदनशील राहण्याची गरज आहे. बालवयातच शिक्षकांविषयीचा आदराचे संस्कार त्यांच्या मनात कसे रूजतील या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. बालवयात अशाप्रकारे मारहाण झाल्यास मोठी दुर्घटनाही घडू शकते, याचे भान शिक्षकांनी ठेवावे. कारण मुलांची शारिरिक व मानसिक क्षमता वयाच्या दृष्टीने कमी असते.
--