दाटवस्तीच्या प्रतिबंधित क्षेत्रात आता सीसीटीव्हीची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 12:40 AM2020-05-29T00:40:41+5:302020-05-29T00:42:01+5:30
शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यानंतर त्यात पूर्वदक्षता घेऊन कोरोनावर मात करण्यासाठी महापालिकेने एक पाऊल पुढे टाकले आणि एकही संशयित रुग्ण झोपडपट्टी परिसरात किंवा अन्यत्र असू नये यासाठी आरोग्य विभागाने शोधमोहीम राबविण्यास सुरुवात केली. त्यातून नऊ बाधित प्रशासनाला आढळले. त्यातून त्यांच्यावर उपचार तर सुरू करण्यात आला, परंतु संसर्गदेखील टाळता आला आहे. त्याही पुढे जाऊन प्रतिबंधित दाट वस्तीत संसर्ग वाढू नये यासाठी सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यानंतर त्यात पूर्वदक्षता घेऊन कोरोनावर मात करण्यासाठी महापालिकेने एक पाऊल पुढे टाकले आणि एकही संशयित रुग्ण झोपडपट्टी परिसरात किंवा अन्यत्र असू नये यासाठी आरोग्य विभागाने शोधमोहीम राबविण्यास सुरुवात केली. त्यातून नऊ बाधित प्रशासनाला आढळले. त्यातून त्यांच्यावर उपचार तर सुरू करण्यात आला, परंतु संसर्गदेखील टाळता आला आहे. त्याही पुढे जाऊन प्रतिबंधित दाट वस्तीत संसर्ग वाढू नये यासाठी सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरात सुरुवातीला कोरोनाबाधितांची संख्या मर्यादित होती आणि तिही विरळ वस्तीत होती. परंतु ज्यावेळी वडाळा आणि जुन्या नाशिकसारख्या दाट वसाहतीत रुग्ण आढळले. तेव्हा मात्र, महापालिका हादरली. मालेगावप्रमाणे शहरात सामुहिक संसर्ग होऊ नये यासाठी महापालिकेने सर्व झोपडपट्ट्या अणि दाटवस्तीचा भाग तपासणीचा निर्णय घेतला. वडाळा परिसरातूनच त्याची सुरुवात करण्यात आली.
महापालिकेने यासाठी दोनशे वैद्यकीय पथके तयार केली असून, त्यामार्फत वडाळा, शिवाजीवाडी, क्रांतिनगर, जुने नाशिक अशा विविध भागांतील ३४ हजार ५१ घरांना भेटी दिल्या असून, १ लाख ५३ हजार २१४ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. या मोहिमेत थंडी खोकल्याचे रुग्णदेखील तपासले जात असून, आत्तापर्यंत साठ जणांना त्रास होतो असे कळल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. त्यात वडाळा येथे पाच, शिवाजी वाडीत एक आणि रामनगर येथे एक, तर क्रांतिनगर येथे दोन असे नऊ बाधित आढळले आहेत, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी सांगितले. पूर्व दक्षतेमुळे संबंधितांचा वेळीच शोध लागला आणि त्यांच्यावर उपचार करताना अन्य कोणाला त्याचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले. त्यामुळे सामूहिक संसर्ग टळला आहे.
दरम्यान, शहरातील वडाळा, शिवाजीवाडी, क्रांतिनगर अशा विविध दाट वस्तींच्या भागात प्रतिबंधित क्षेत्र घोषित केल्यानंतर सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून त्याद्वारे नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रात संसर्ग टाळल्यास मदत होणार आहे. या सीसीटीव्हींचे नियंत्रण पोलिसांकडे देण्यात येणार आहे.
प्रतिबंधित क्षेत्रात शौचालय
संसर्ग वाढू नये यासाठी महापालिकेच्या वतीने दक्षता घेतली जात असली तरी अनेक झोपडपट्टी भागात किंवा दाटवस्तीत सार्वजनिक शौचालयांमध्ये दूरवर जावे लागते. मात्र, त्यातून प्रतिबंधित क्षेत्रातून कोणी दूर जाऊ नये, यासाठी महापालिकेने आता प्रतिबंधित क्षेत्रातदेखील फिरते शौचालये आणून ठेवले आहेत. वडाळा, क्रांतिनगर, शिवाजीवाडी आणि रामनगर येथे अशाप्रकारची व्यवस्था राबविण्यात आली आहे.