सिग्नलवरील सीसीटीव्ही अडकले वादात; वाहनचालक बेफाम वेगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:14 AM2020-12-06T04:14:44+5:302020-12-06T04:14:44+5:30
नाशिक : शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ४७ सिग्नलवर सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. मात्र, गेल्यावर्षी प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट सिटीअंतर्गत त्र्यंबक ...
नाशिक : शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ४७ सिग्नलवर सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. मात्र, गेल्यावर्षी प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट सिटीअंतर्गत त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ या मार्गादरम्यान काही ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले. परंतु त्यानंतर हे काम ठप्प असून, त्यामुळेच बेशिस्त वाहनचालकांना आवार घालण्यात पोलीस यंत्रणेलादेखील अपयश येत आहे.
शहरात कुंभमेळ्यापासून सीसीटीव्ही बसवण्याची मागणी होत होती. स्मार्ट सिटीअंतर्गत हे काम होत असले तरी प्रत्यक्षात राज्य शासन महाआयटीच्या माध्यमातून हे काम होत आहे. गेल्यावर्षी स्मार्ट रोडवर कॅमेरे बसवण्यास सुरुवात झाल्यानंतर गेल्या मे महिन्यातच ४७ सिग्नल बसवण्यात येणार होते. मात्र, चिनी कॅमेरे असल्याचा राजकीय आक्षेप आणि नाइट व्हिजनमधील अडथळे यामुळे हे काम थंडावले. कॅमेऱ्यांचे प्रत्यक्ष काम कसे चालेल, हे कंपनीला सादर करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र अजूनही हे काम पूर्ण झालेले नाही असे स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ प्रकाश थविल यांनी सांगितले.
----
असे चालणार कंट्रोल रूमचे कामकाज
नाशिक महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने शहरात सीसीटीव्ही लावण्याची जबाबदारी घेतली असली तरी मुळातच हे काम राज्य शासनाच्या महाआयटीमार्फत होत आहे. ते सर्व कॅमेरे स्मार्ट सिटी कंपनीच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरशी जोडले जातील. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालयात नियंत्रण कक्षातदेखील ते जोडले जातील. त्यामुळे सिग्नल आणि अन्य मार्गांवर वाहतूक नियमांचा भंग होत असेल तर तो तत्काळ कॅमेरा कॅच करेल. सीसीटीव्ही नंबरप्लेट रीडिंग करणार असल्याने त्यांना ॲटो जनरेटेड चलन पाठवले जाईल.
--------------
या कारणास्तव होते कारवाई
वाहतूक नियमांचा भंग म्हणजेच सिग्नल तोडणे, नो पार्किंग, राँगसाइड जाणे यासारख्या नियमभंगासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग होणार आहे. नाशिक शहरात इंदिरानगरजवळील बोगद्यात प्रयोगिक तत्त्वावर कारवाई करण्यात आली आहे.
------------------
इंदिरानगर जवळ झाली चाचणी
शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या पुलाखाली बोगद्यातून एकेरी वाहतूक सुरू आहे. तेथे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी सीसीटीव्हीचा वापर करण्यात आला होता. त्यातून अनेक वाहनचालकांना घरपोहोच चलन गेले.
----------------
कोट...
नाशिक शहरात सीसीटीव्ही बसवण्याचे काम तांत्रिक कारणामुळे मागे पडले असले तरी लवकरच या कारणांचे निराकरण हेाईल आणि ४७ सिग्नलवर कॅमेरे बसवण्यास सुरुवात होईल. पुढील वर्षी मे माहिन्यापर्यंत हे काम पूर्ण होऊ शकेल आणि बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई होऊ शकेल.
- प्रकाश थविल, सीईओ, स्मार्ट सिटी