नाशकात शिवराय ते भिमराय जन्मोत्सव साजरा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 02:18 PM2018-02-09T14:18:38+5:302018-02-09T14:21:24+5:30
छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच सर्व समाजाला एकत्र जोडण्याचे व अन्यायाविरूद्ध वाचा फोडण्याचे काम केले. या महापुरूषांनी सर्व समाजााठी काम केलेले आहे परंतु काही समाजकंटके या महापुरूषांच्या नावे आपल्या समाजात जाणीवपुर्वक विष कालविण्याचे काम करीत असल्याचे आजवरच्या काही घटनांवरून स्पष्ट झाले आहे.
नाशिक : महाराष्ट्रातील सध्याचे जातीय तणावाचे वातावरण पहाता नाशिकमधील परिवर्तनवादी संघटना व पक्षांनी सामाजिक ऐक्य बळकट करण्यासाठी व तरूणांपर्यंत या महापुरूषांचे खरे विचार पोहोचविण्यासाठी शिवराय ते भीमराय जन्मोत्सव २०१८ एकत्रितपणे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच सर्व समाजाला एकत्र जोडण्याचे व अन्यायाविरूद्ध वाचा फोडण्याचे काम केले. या महापुरूषांनी सर्व समाजााठी काम केलेले आहे परंतु काही समाजकंटके या महापुरूषांच्या नावे आपल्या समाजात जाणीवपुर्वक विष कालविण्याचे काम करीत असल्याचे आजवरच्या काही घटनांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे समाजात या दोन्ही महापुरूषांच्या नावे फूट पाडणा-यांना चोख उत्तर देण्यासाठी व सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी ‘शिवराय ते भीमराय जन्मोत्सव २०१८’ साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे. या संदर्भात गुरूवारी रमाबाई आंबेडकर विद्यालयात बैठक घेण्यात आली व त्यात जन्मोत्सवाची रूपरेषा ठरविण्यात आली आहे. या जन्मोत्सवाला १९ फेब्रुवारी शिवजयंतीपासून सुरूवात करण्यात येणार असून, ११ एप्रिल रोजी फुले जयंती व १४ एप्रिल रोजी भीमजयंती या समितीद्वारे साजरी केली जाईल. या दरम्यान १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशा नाशिक शहरातून निघणा-या शिवपालखी सोहळ्यात ‘शिवराय ते भीमराय जन्मोत्सव’ समितीतर्फे पाणी वाटप तसेच डॉ. आंबेडकर व शिवाजी महाराज यांच्या विचाराचे फलक एकत्रितरित्या प्रदर्शित करून समाजप्रबोधन करण्यात येईल. शिवराय ते भीमराय या विषयावर निबंधस्पर्धा व हिडीओ ब्लॉग स्पर्धा घेण्याचे ठरविण्यात आले.
या उपक्रमात भाकप, आम आदमी पार्टी, भारिप बहुजन महासंग, छात्रभारती, मार्शल ग्रृप, विवेकवाहिनी या पक्ष व संघटनांचा सहभाग असून, अन्य पक्ष, संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. समितीची पुढील बैठक १० फेब्रुवारी रोजी रमाबाई आंबेडकर विद्यालयात सायंकाळी पाच वाजता घेण्यात येणार आहे. या बैठकीस राजू देसले, नितीन भुजबळ, स्वप्नील घिया, तुषार जगताप, विनय कटारे, योगेशा कापसे, सुरेश नखाते, अभिजीत गोसावी, विशााल रनमाळे, राज खरात, महादेव खुडे, स्वप्नील वंजोरी, शरद कोकाटे, करूणासागर पगारे आदी उपस्थित होते.