हरतालिका उत्साहात साजरी
By admin | Published: September 17, 2015 12:10 AM2015-09-17T00:10:46+5:302015-09-17T00:11:55+5:30
हरतालिका उत्साहात साजरी
नाशिक : शहर परिसरातील महादेवाचे मंदिर तसेच इतर सार्वजनिक ठिकाणे बुधवारी महिलांच्या गर्दीने फुलून गेली होती. मंदिरा मंदिरांमध्ये शिव पार्वती मंत्रांनी वातावरण दरवळून निघाले होते.
बुधवारी (दि. १६) शहरात सर्वत्र हरतालिका व्रत उत्साहात साजरे करण्यात आले. विवाहित स्त्रियांबरोबर कुमारिकांनीसुद्धा हरतालिका व्रताची मनोभावे पूजा केली. पार्वतीने हे व्रत करून शिवाला प्राप्त करून घेतले या आख्यायिकेनुसार आपल्यालाही उत्कृष्ट पती मिळावा तसेच लाभलेला पती दीर्घायुषी आणि आरोग्यवान होऊन आपल्यासाठी अनुकूल व्हावा यासाठी महिलांनी हे व्रत केल्याचे सांगितले.
शहरातील तीन वर्ष वयोगटातील कुमारिकांनीसुद्धा हे व्रत केले होते. पहाटे लवकर उठून महिलांनी तीळ आणि आवळा यांचे मिश्रण असलेल्या चूर्णाने अभ्यंगस्नान केले. यानंतर पुरोहितांच्या हस्ते पौरोहित्य करवून घेत त्यांच्याकडून हरतालिका व्रतामागची संकल्पना समजावून घेत कहाणीचे श्रवण केले. यावेळी पुरोहितांनी महिलांना अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी आशीर्वाद दिले.
पूजेच्या वेळी आरती, धूप, उदबत्ती यामुळे वातावरणात वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते. रात्री महिलांनी जागरण करून भक्तिसंगीताचे सादरीकरण केले. हरतालिकेचा संपूर्ण दिवस उपवास केला. (प्रतिनिधी)