सण-उत्सव साधेपणाने साजरे करा; कोरोनाची साखळी तोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:13 AM2021-04-14T04:13:51+5:302021-04-14T04:13:51+5:30
______ नाशिक : नुकताच पार पडलेला गुढीपाडवा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि रमजान पर्व असे सण-उत्सव लागोपाठ ...
______
नाशिक : नुकताच पार पडलेला गुढीपाडवा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि रमजान पर्व असे सण-उत्सव लागोपाठ जोडून आले आहेत. तर दुसरीकडे कोरोनाचा फैलावदेखील वेगाने होत आहे. यामुळे शासनाच्या आदेशानुसार सर्व धर्मीयांनी आपापले सण, उत्सव अगदी साधेपणाने साजरे करावे आणि कोरोनाची साखळी तोडावी, असे आवाहन नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी मंगळवारी (दि. १३) नियोजन आढावा बैठकीनंतर बोलताना केले.
राज्यासह नाशकातसुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे राज्य शासनाने कडक निर्बंध जाहीर केले असून जमावबंदी व संचारबंदीचा आदेश लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर आगामी आंबेडकर जयंती व रमजान पर्वाच्या निमित्ताने समाजबांधवांनी साधेपणाने घरगुती पद्धतीने सण साजरे करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. याबाबत स्वतंत्र परिपत्रक काढण्यात आले आहे. या परिपत्रकात दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याची गरज असल्याचे पांडेय म्हणाले.
गेल्या वर्षीप्रमाणे शहरातील मुख्य मार्गावरील वाहतूक तसेच शहरातील गर्दी होणाऱ्या प्रमुख ठिकाणांवर पॉइंट तयार करण्यात आले आहेत. आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात कोठेही मिरवणुका, शोभायात्रा काढण्यास परवानगी देण्यात आलेली नाही, असेही पांडेय यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र जमणे टाळावे, जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. तसेच रात्री आयुक्तालयात संचारबंदी असल्याने शहरभर पोलीस बंदोबस्त तैनात राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
------इन्फो----
अभिवादनासाठी पाच लोकांना परवानगी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववर्ष स्वागताप्रमाणेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्यावरसुद्धा मिरवणुका, सार्वजनिक प्रार्थना, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादनासाठी केवळ पाच व्यक्तींना परवानगी देण्यात आली असून सर्वांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे, असे पांडेय यांनी सांगितले.