गणेश जन्मसोहळा उत्साहात
By Admin | Published: February 1, 2017 01:14 AM2017-02-01T01:14:29+5:302017-02-01T01:14:44+5:30
माघी गणेश जयंती : तिलकुंद चतुर्थीनिमित्त सहस्त्र तिळाचे लाडू
नाशिक : जो जो जो जो रे गजवदना । मयुरेश्वर सुखवदना ।। निद्रा करी बाळा एकदंता । सकळादी गुणसगुणा ।। अशा सामूहिक स्वरात गायलेल्या पाळणा गीतांनी शहरात सर्वत्र माघी गणेश जन्मसोहळा मंगळवारी (दि. ३१) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रविवार कारंजा येथील सिद्धिविनायक (चांदीचा गणपती) मंदिरात माघी गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी गणेशजन्म सोहळ्याच्या पूर्वसंध्येला भव्य गणेशयाग आणि सहस्त्र दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला होता. मंगळवारी पहाटे साडेचार वाजेपासूनच सनईच्या सुरावटीने गणेश देवतेला अभ्यंगस्नान, महादुग्धाभिषेक तसेच शताषौधी स्नान, फलस्नान, दशाविध स्नान करण्यात येऊन दुपारी ठीक १२ वाजता भगवंताचा जन्मसोहळा पुष्पवर्षावाने तसेच विविध पाळणा गीतांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आकर्षक फुलांच्या माळांनी सजवलेल्या पाळण्यात गणेशाला विराजमान करण्यात आले आणि पाळणाआरती, गणेशाचा सर्वत्र जयजयकार करण्यात आला. गणेशजन्म सोहळ्यानंतर सहस्त्र मोदक, तिलकुंद चतुर्थीनिमित्त सहस्त्र तिळाच्या लाडवांचा नैवेद्य देवाला अर्पण करण्यात आला. यावेळी भाविकांच्या मनोकामना पूर्तीसाठी सुकामेवा, वेलची, शमीपत्र, लाल पुष्प, सुवर्ण, दुर्वांकूर, हळद, श्रीफळ, हिरण्य यांचेही अर्चन करण्यात आले. दुपारी साडेचार वाजता पूर्णाहूती सोहळ्यानंतर महाप्रसाद वाटपाने या सोहळ्याची सांगता झाली. गणेश जयंतीनिमित्त आयोजित विशेष अर्चन पूजेत ८५ जोडप्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी याग पूजनाचे पौराहित्य चिन्मय देव, तर गणेश जयंती सोहळ्याचे पौराहित्य अक्षय जोशी, योगेश कुलकर्णी, हृषिकेश जोशी यांनी केले. मंदिराचे ट्रस्टी रवींद्र पगार यांना या वर्षीच्या पूजेचा मान मिळाला. दरम्यान, शहरातील नवश्या गणपती, इंदिरानगर येथील मोदकेश्वर गणपती मंदिर, दीपालीनगर येथील सिद्धिविनायक मंदिर, डीजीपी क्र १ येथील विघ्नहरण देवस्थान, भद्रकाली परिसरातील साक्षी गणेश गणपती मंदिर, मेनरोड येथील प्रसिद्ध गणेश मंदिर, विहितगाव येथील अण्णा गणपती नवग्रह सिद्धपीठ आदि मंदिरांमध्येही गणेशजन्म सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी सामूहिक अथर्वशीर्ष पठण, गणेशस्तोत्राचे पठण करण्यात आले, गणेश जयंतीनिमित्त भक्तांनी दिवसभर उपवास करून रात्री तिळाचा लाडू ग्रहण करून व्रताची सांगता केली. (प्रतिनिधी)