तिसऱ्या शाही मिरवणुकीचा आज रंगणार सोहळा
By admin | Published: September 17, 2015 11:58 PM2015-09-17T23:58:03+5:302015-09-18T00:32:20+5:30
पोलिसांकडून व्यवस्था : स्नानानंतर आखाडे गोदाघाटावरच थांबणार
नाशिक : यंदाच्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील तिसऱ्या शाहीस्नानानिमित्त वैष्णव साधूंच्या अखेरच्या शाही मिरवणुकीचा सोहळा शुक्रवारी (दि. १८) रंगणार आहे. गेल्या वेळेप्रमाणेच उद्याही बंदोबस्त शिथिल राहणार असल्याने भाविकांना हा सोहळा डोळ्यांत साठवता येणार आहे. दरम्यान, गेल्या मिरवणुकीप्रमाणेच उद्याही निर्मोही आखाडा प्रथम क्रमांकावर राहणार आहे; मात्र परतताना निर्वाणी आखाडा प्रथम क्रमांकावर असेल. शाहीस्नान होईपर्यंत आखाड्यांचे प्रमुख साधू-महंत गोदाघाटावरच थांबणार असून, त्यांच्यासाठी पोलिसांकडून स्वतंत्र मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे.
द्वितीय शाही मिरवणुकीत निर्बंध हटवल्याने भाविकांना या सोहळ्याचा मनमोकळा आनंद घेता आला; मात्र या मिरवणुकीत काही ठिकाणी गोंधळही उडाला. उद्याच्या मिरवणुकीत असे प्रकार टाळण्याचा पोलिसांचा प्रयत्न राहील. शुक्रवारी सकाळी ६ वाजता शाही मिरवणूक निघणार आहे. फुलांनी सुशोभित केलेले रथ, उंट-घोड्यांवर विराजमान साधू-महंत, श्री महंत-महंतांची सहाशेहून अधिक वाहने, भजन-संकीर्तन करणारे पन्नास हजारांहून अधिक साधू, डोळ्यांचे पारणे फेडणारे मर्दानी खेळ असा लवाजमा या मिरवणुकीत राहणार आहे. साधूंचे आखाडे हे ध्वज, निशाण व इष्टदेवतांना घेऊन साधुग्राममधून मिरवणुकीने एकापाठोपाठ शाहीस्नानासाठी पवित्र रामकुंडाकडे रवाना होतील.
प्रथम शाही मिरवणुकीत निर्वाणी, दिगंबर व निर्मोही असा आखाड्यांचा क्रम होता. द्वितीय मिरवणुकीत त्यात बदल होऊन निर्मोही आखाडा पहिल्या क्रमांकावर राहिला होता, तर निर्वाणी आखाडा तिसऱ्या क्रमांकावर होता. उद्यादेखील हाच क्रम कायम राहणार आहे. साधुग्राममधील लक्ष्मीनारायण मंदिरापासून सकाळी ६ वाजता निर्मोही आखाड्याची मिरवणूक निघेल. ६.३० वाजता दिगंबर, तर ७ वाजता निर्वाणीच्या मिरवणुकीला प्रारंभ होईल. प्रत्येक आखाड्याच्या मिरवणुकीत दोनशे मीटरचे अंतर राहणार आहे. लक्ष्मीनारायण मंदिर, काट्या मारुती पोलीस चौकी, गणेशवाडी देवी चौक, पंचवटी आयुर्वेदिक कॉलेज, गौरी पटांगण, म्हसोबा पटांगण, सरदार चौक या मार्गे मिरवणूक रामकुंडावर पोहोचेल. तेथे निशाण व इष्टदेवतेचे विधिवत पूजन केले जाईल. इष्टदेवता हनुमानाला स्नान घातले जाईल. त्यानंतर आखाड्याच्या प्रमुख श्री महंतांचे व नंतर साधूंचे स्नान होईल. मागील दोन्ही स्नानांच्या वेळी ज्या क्रमाने आखाडे गोदाघाटावर दाखल झाले, त्याच क्रमाने साधुग्रामकडे परतले होते. उद्या मात्र तिन्ही आखाड्यांचे प्रमुख साधू-महंत स्नान झाल्यानंतर गोदाघाटावर थांबणार असून, परतताना निर्वाणी, दिगंबर व निर्मोही असा आखाड्यांचा क्रम राहणार आहे. (प्रतिनिधी)