महिला दिन विशेष मुलींसोबत साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:17 AM2021-03-09T04:17:40+5:302021-03-09T04:17:40+5:30
नाशिक : जागतिक महिला दिनानिमित्त अभिनव लेडीज ग्रुप, नाशिक यांच्या वतीने घरकुल संस्थेतील विशेष मुलींसह महिला दिन साजरा ...
नाशिक : जागतिक महिला दिनानिमित्त अभिनव लेडीज ग्रुप, नाशिक यांच्या वतीने घरकुल संस्थेतील विशेष मुलींसह महिला दिन साजरा केला. तसेच घरकुल संस्थेला ग्राईंडर मिक्सर भेट देण्यात आला.
याप्रसंगी संस्थेच्या प्रमुख विद्याताई फडके यांनी घरकुल परिवारातील सदस्यांबद्दल माहिती दिली. मानसिक अपंगत्व घेऊन जन्माला आलेले मूल विशेष असते. समाज त्यांना ‘विशेष’ असं संबोधत असला तरी, त्यांच्या या विशेष असण्याला असहायतेची किनार असते. समाजातील या उपेक्षित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी नाशिकमधील ‘घरकुल’ संस्था धडपड करत आहे.
विद्या फडके या परिवाराच्या संस्थापक सदस्य आहेत. गेली ४० वर्षे त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. हे घरकुल ‘होम अवे फ्रॉम होम’ या संकल्पेवर आधारित असून, ही सरकारमान्य संस्था आहे. मात्र, संस्थेला सरकारी अनुदान मिळत नाही. त्यामुळे ही संस्था पूर्णपणे समाजाच्या सहकार्यावर चालते. सध्या १५ वर्षांपासून ते ६७ वर्षांपर्यंतच्या ४७ मुली, महिला ‘घरकुल’मध्ये आहेत. अभिनवच्या संस्थापक अध्यक्षा रजनी जातेगांवकर यांनी महिला दिन हा फक्त मुख्य धारेतील महिलांसाठीच नसून या विशेष मुलींसाठी अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्यांना आत्मनिर्भर बनवत मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजाने एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. याप्रसंगी अभिनवच्या रंजना तांबट, उषा जातेगांवकर, सुरेखा तांबट, विमल कलंत्री, हेमा झंवर, नयना भुतडा, लीना तांबट, राजश्री चांडक उपस्थित होत्या.