शहरात गुरुनानक जयंती उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:49 AM2018-11-24T00:49:38+5:302018-11-24T00:50:15+5:30
गुरुद्वारावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई, लहान मुलांसह ज्येष्ठांसाठी प्रवचन, शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असलेला लंगरचा कार्यक्रम अशा विविध धार्मिक उपक्रमांनी शीख धर्माचे संस्थापक व पहिले धर्मगुरू गुरुनानक यांची जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली़
नाशिक : गुरुद्वारावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई, लहान मुलांसह ज्येष्ठांसाठी प्रवचन, शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असलेला लंगरचा कार्यक्रम अशा विविध धार्मिक उपक्रमांनी शीख धर्माचे संस्थापक व पहिले धर्मगुरू गुरुनानक यांची जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली़ शुक्रवारी (दि़२३) दिवसभर शहरातील गुरुद्वारांमध्ये आयोजित धार्मिक कार्यक्रमांमध्ये शिख बांधव सहभागी झाले होते़
शहरातील गुरुद्वारांमध्ये १३ नोव्हेंबरपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली होती़ १३ ते १७ नोव्हेबरपर्यंत या कालावधित पहाटे ५ ते ८ या कालावधित शहरातील विविध ठिकाणी प्रभातफेरी काढण्यात आली. १८ नोव्हेंबर रोजी नगर कीर्तन झाले.
गुरुनानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त शहरातील शिंगाडा तलाव येथील गुरुद्वारापासून काढण्यात आलेल्या शोभायात्रेचा समारोप पंचवटीतील गुरुद्वारात झाला़ गुरुनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध गुरुद्वारांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम तसेच प्रभातफेरी काढण्यात आली होती.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी ओमवीर सिंग यांचे कीर्तन, अखंड पाठाची समाप्ती, मनिंदरपाल सिंग, ओमवीर सिंग, ग्यानी नवनित सिंग, मनिंदर पाल, रेहरास साहेब, ग्यानी जगविंदर सिंग आदींची कीर्तने झाली.