जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:09 AM2018-03-26T00:09:25+5:302018-03-26T00:09:25+5:30

येथील श्रीराम चौक मित्रमंडळातर्फे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद सभापती यतिन पगार व सरपंच शांताराम अहिरे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

 Celebrated Ram Navami in the district | जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी

जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी

googlenewsNext

जायखेडा : येथील श्रीराम चौक मित्रमंडळातर्फे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद सभापती यतिन पगार व सरपंच शांताराम अहिरे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपसरपंच संजय मोरे, मच्छिंद्र खैरनार, बापू शेवाळे, भास्कर अहिरे, ज्ञानेश्वर पाटील, ग्रा. पं. सदस्य वसंत खैरनार, सुरेश अहिरे, डॉ. विशाल खैरनार, छाया जगताप, अहिल्याबाई अहिरे, वृषाली जगताप, हर्षली खैरनार, आदींसह गावातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी जय श्रीराम, श्रीरामचंद्र की जय अशा घोषणा देत तरुणाईने संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. दुचाकी वाहनांवर भगवे झेंडे लावून जायखेडा व परिसरातून तरुण कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढली . यावेळी कार्यकर्त्यांनी भगवे ध्वज हातात घेऊन श्रीरामचंद्र की जय असा जयघोष केला. गावातील पुरातन महादेव मंदिर, वै. कृष्णाजी माउली निवासस्थान व विठ्ठल मंदिरात भजन पूजन व महाप्रसादाचे वाटप करून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम चौक मित्रमंडळाचे सदस्य, भजनी मंडळ व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी आठ वाजेपासून राम भक्तांनी श्रीराम प्रभू यांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरामध्ये गर्दी केली होती. सनई, भूपाळी, भजन, आरती करण्यात येऊन दुपारी बारा वाजता राम जन्मोत्सव साजरा करण्यात येऊन प्रभू रामचंद्राच्या जीवनावर पाळणा , गौळणी, भारुड आदीचे गायन करण्यात येऊन प्रसाद वाटण्यात आला. यावेळी प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण यांचे मोठ्या भक्तिभावाने भाविकांनी दर्शन घेतले.
चांदवडला विविध कार्यक्रम
चांदवड : येथील पुरातन श्रीरामरोडवरील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त रविवारी (दि. २५) श्रीराम जन्मोत्सव सोहळा झाला. दुपारी १२ वाजता श्रीरामजन्मास हजारो भाविकांनी गर्दी केली होती. तर गुढीपाडव्यापासून रविवार, दि.१८ ते २६ मार्च पावेतो दररोज दुपारी २.३० ते ६.३० या वेळेत रामकथा (वाल्मीकी रामायण) कार्यक्रम कथाकार रजनी अशोक कुलकर्णी (धुळे) या सादर करीत असून, या रामकथेस महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती होती. सोमवारी (दि. २६) रामकथेची समाप्ती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल अशी माहिती अ‍ॅड. अनिल धर्माधिकारी, अ‍ॅड. सचिन कुलकर्णी यांनी दिली. दरवर्षी राममंदिरात गुढीपाडव्यापासून कीर्तन होत असे; मात्र यंदा यात बदल करून रामकथा करू असे स्व. उमाकांत धर्माधिकारी यांनी गेल्या दोन वर्षांपूर्वी सांगितले होते; मात्र त्यांचे अचानक निधन झाल्याने यंदा रामकथा घेण्यात आल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.   श्रीरामजन्मउत्सवात प्रचंड गर्दी भाविकांनी केली होती .
मानोरी : येथे प्रभू रामचंद्र यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. सकाळपासूनच श्रीरामचंद्र यांच्यावर आधारित भक्तिमय गीतांचे गायन करण्यात आले. दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत हरिपाठ घेण्यात आला. बारा वाजता श्रीरामचंद्र यांचा जन्म होत असल्याची आख्यायिका सांगून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून प्रसाद वाटून जन्मदिवस साजरा करण्यात आला. यावेळी परशराम साठे, श्रीपत साठे, सुखदेव लहरे, शिवाजी भवर, दशरथ वाघ, रामभाऊ शेळके, सुदाम बोराडे, त्र्यंबक शेळके, हर्षद शेळके, तुषार शेळके आदी ग्रामस्थ उपस्थित होते. खामखेडा गावातील श्रीराम मंदिर परिसर स्वच्छ करण्यात येऊन सडा संमार्जन करण्यात येऊन रांगोळ्या काढण्यात येऊन, पताकांनी मंदिर परिसर सजविण्यात आला होता. पुरातन राममंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून मंदिराचे काम अद्याप अपूर्ण असल्याने मंदिर परिसरात, राम-लक्ष्मण, सीता यांच्या प्रतिमांचा फोटो ठेवून भटजी नारायण बुवा यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
देवळ्यात अभिषेक
देवळा : रामभक्तांनी राममंदिरात जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. प्रात:काळी श्रीरामास अभिषेक करण्यात आला. यानंतर तात्या महाराज भुईगव्हाणकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्र म झाला. दुपारी १२ वाजता रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. मंगळवारी (दि. २७) ज्ञानेश्वर महाराज सणादेव पाडेकर हरी कीर्तन श्रीराम मंदिरात होणार असून, त्याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन भजनी मंडळातर्फे करण्यात आले आहे. ज्ञानेश्वर भजनी मंडळ व मुक्ताई भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रामजन्मोत्सव कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्व. शोभाबाई अहिरराव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भक्तांना राम रसाचे वाटप करण्यात आले.
ठाणगावी मंदिर परिसरात रोषणाई
ठाणगाव : ठाणगाव येथील श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. येथील श्रीराम मंदिरात समस्त ग्रामस्थ व ज्ञानेश्वर भजनी मंंडळाच्या वतीने राम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळी ८ वाजता ज्ञानेश्वर भजनी मंंंडळाचे भजन झाले. भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. मंदिरात दुपारी १२ वाजता राम जन्मावेळी मंदिरातील श्रीराम, लक्ष्मण, सीता व मारुती यांच्या मूर्तींची विविध अलंकारांनी सजावट करण्यात आली. महिलांनी पाळणा म्हणत राम जन्माचे स्वागत केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामस्थ व ज्ञानेश्वर भजनी मंडळाने प्रयत्न केले.

Web Title:  Celebrated Ram Navami in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.