येवल्यात मुक्तीभूमीवर बुद्धजयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 05:26 PM2019-05-18T17:26:23+5:302019-05-18T17:26:41+5:30
मिरवणूक : ठिकठिकाणी प्रतिमापूजन, अभिवादन
येवला : येथील ऐतिहासिक मुक्तीभूमीवर जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या २५६३ वी जयंती निमित्त शेकडो भाविकांनी ‘आत्मो दिपो भव:’ चा संकल्प करीत मानवंदना दिली. शनिवारी (दि.१८) सकाळी ९ वाजता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमीवर ब्ल्यू पँथर संघटनेचे अध्यक्ष सुभाष गांगुर्डे, शुद्धोधन तायडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहरातून मोठी मिरवणूक काढण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे कार्यकर्ते या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शुद्धोधन तायडे यांनी गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती, व महापरीनिर्वाण याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. बुद्धांनी ४५ वर्ष या भूतलावर पायी प्रवास करून जीवनाचा सार व जीवनमूल्ये सांगितली. सुखी जीवनाचा मार्ग, दु:ख कसे विसरावे यावर सुभाष गांगुर्डे यांनी विचार व्यक्त केले. बुद्ध जयंती निमित्त तालुक्यासह जिल्हाभरातून येथील मुक्तीभूमीवर भगवान गौतम बुद्धांना अभिवादन करण्यासाठी शेकडो भाविक आले होते.
स्वारिपतर्फे कार्यक्रम
शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुक्तीभूमी स्मारक येथे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तथा युथ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीसमोर सामुदायिक त्रिशरण व पंचशिल ग्रहण करण्यात आले. यावेळी स्वारिपचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी गौतम बुद्धांच्या विचारांवर मार्गदर्शन केले. यावेळी भाऊसाहेब गरु ड, शुद्धोधन तायडे, शशिकांत जगताप, साजिद शेख यांची बुद्ध धम्म चरित्रावर मार्गदर्शनपर भाषणे झाली. यावेळी खिरदानाचेही आयोजन करण्यात आले होते.