रंगांची उधळण करीत धूलिवंदन सण साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 01:13 AM2018-03-03T01:13:43+5:302018-03-03T01:13:43+5:30
भारतीय समाज हा उत्सवप्रिय असून, प्रत्येक सण-उत्सवामागे धार्मिक व सांस्कृतिक प्रथा-परंपरा आहे. गुरुवारी होळीचा सण साजरा झाल्यानंतर शुक्रवारी (दि. २) सर्वत्र धुळवड तथा धूलिवंदन या सणाला आबालवृद्धांनी रंगांची उधळण करीत जल्लोष केला. प्रामुख्याने उत्तर भारतीयांचा मानला जाणारा हा सण आता मराठी भाषिकदेखील मोठ्या प्रमाणावर साजरा करीत असून, सातपूर, सिडको परिसरातील उत्तर भारतीयांबरोबरच अन्य तरुणांनीदेखील धूलिवंदना निमित्त एकमेकांना गुलाल आणि रंग लावून रंगोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
नाशिक : भारतीय समाज हा उत्सवप्रिय असून, प्रत्येक सण-उत्सवामागे धार्मिक व सांस्कृतिक प्रथा-परंपरा आहे. गुरुवारी होळीचा सण साजरा झाल्या-नंतर शुक्रवारी (दि. २) सर्वत्र धुळवड तथा धूलिवंदन या सणाला आबालवृद्धांनी रंगांची उधळण करीत जल्लोष केला. प्रामुख्याने उत्तर भारतीयांचा मानला जाणारा हा सण आता मराठी भाषिकदेखील मोठ्या प्रमाणावर साजरा करीत असून, सातपूर, सिडको परिसरातील उत्तर भारतीयांबरोबरच अन्य तरुणांनीदेखील धूलिवंदना निमित्त एकमेकांना गुलाल आणि रंग लावून रंगोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. होळीनंतर दुसºया दिवशी होळीमध्ये पाणी ओतून ती राख एकमेकांच्या अंगावर शिंपडली जाते. यालाच धुळवड असे म्हणतात. आगीपासून जीवितहानी होऊ नये म्हणून काही लोक धुळवडीला होळीची राख घरी नेतात. फाल्गुन वद्य प्रतिपदेला धूलिवंदन सण साजरा करतात. प्रामुख्याने उत्तर भारतात धुळवड किंवा धूलिवंदन उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. सातपूर येथे आयटीआय पुलानजीक नवदुर्गामाता मंदिरापासून धूलिवंदन उत्सवाला सुरुवात झाली. सिडको, इंदिरानगर, पंचवटी, गंगापूररोड आदी भागांतील मूळ उत्तर भारतातील रहिवासी असलेल्या नागरिकांनी धुळवडीचा सण उत्साहात आणि आनंदात साजरा केला. एकमेकांना गुलाल आणि रंग लावत सणाच्या शुभेच्छा दिल्या.
उपनगर परिसरात धुळवड साजरी
उपनगर व आजूबाजूच्या परिसरात लहान बालगोपाळांसह वयोवृद्धांनी एकमेकांना रंग लावून मोठ्या आनंदाने धुळवडीचा सण साजरा केला. उपनगर, शांतीपार्क, मातोश्रीनगर, काठेनगर, गांधीनगर, टागोरनगर, शिवाजीनगर, आगर टाकळी, डीजीपीनगर रोड आदी ठिकाणी शुक्रवारी सकाळपासून बालगोपाळ एकमेकांना रंग लावून रंगीत पाण्याने भिजवत धुळवड सण साजरा करत होते. ठिकठिकाणी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सुक्या रंगाची धुळवड खेळण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र दिसत होते. बहुसंख्य उत्तर भारतीय रहिवाशांनी टिळा होळी खेळण्यास प्राधान्य दिले होते. दुपारनंतर सोसायटी, कॉलनीतील रहिवासी एकत्र येऊन एकमेकांना कोरडा रंग लावून शुभेच्छा देत होते.