‘हॅपी न्यू इयर’चा जल्लोष
By admin | Published: December 31, 2015 11:42 PM2015-12-31T23:42:32+5:302015-12-31T23:43:14+5:30
थर्टी फर्स्टची झिंग अन् सरत्या वर्षाला निरोप
नाशिक : तपमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास जाऊन पोहोचलेले, विद्युत रोषणाईने नटलेले शहर आणि सोबतीला बेधुंद करणारी संगीताची धून अशा बहरलेल्या वातावरणात ‘थर्टी फर्स्ट’ची झिंग उत्तरोत्तर चढत गेली. मध्यरात्री बरोबर बाराच्या ठोक्याला असंख्य अग्निफुलांनी आसमंत प्रकाशमान झाला आणि चांगल्या-वाईट आठवणींचे गाठोडे सोबत घेऊन नाशिककरांनी सरत्या वर्षाला निरोप देत ‘हॅपी न्यू इयर’चा एकच जल्लोष केला.
सरत्या वर्षात आलेल्या बऱ्या-वाईट अनुभवांबद्दल आत्मचिंतन करत नाशिककरांनी ‘नववर्ष सुख-समृद्धी आणि नवचैतन्य घेऊन येवो’ अशी शुभकामना व्यक्त केली. ३१ डिसेंबरचा दिवसच मुळात उगवला तो नववर्षाच्या स्वागताच्या तयारीसाठी. शासकीय-निमशासकीय कार्यालयातही उपस्थिती जेमतेमच. तरुणाईसाठी तर थर्टी फर्स्टची रात्र पर्वणीच घेऊन आलेली. दुपारपासूनच वाइनशॉप्सवर झुंबड उडाली. बॅँकांच्या एटीएम केंद्रांपुढेही पैसे काढण्यासाठी रांगा लागल्या. केकशॉप्स, मिठाईची दुकाने गजबजली. जल्लोषाच्या नियोजनाची लगीनघाई सरत्या वर्षातील दिनकर मावळतीला लागल्यानंतर गतिमान झाली आणि शहरातील हॉटेल्स, बार येथे खवय्यांनी मैफल जमवण्यास सुरुवात केली. सोबत संगीताच्या तालावर आबालवृद्धांनी फेर धरला आणि मध्यरात्री बरोबर बाराच्या ठोक्याला जल्लोषाला उधाण आले.