नऊ वेळा संप करणाऱ्या ठेकेदाराचा ठेका रद्द करून नाशिक महापालिकेच्या सिटी लिंक बस सेवेचा तिसरा वर्धापन दिन साजरा
By संजय पाठक | Published: July 8, 2024 11:18 AM2024-07-08T11:18:41+5:302024-07-08T11:19:00+5:30
हापालिकेच्या परिवहन बस सेवा म्हणजेच सिटी लिंकचा तिसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
संजय पाठक, नाशिक: गेल्या तीन वर्षात तब्बल नऊ वेळा संप केल्याने प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरलेल्या मार्क्स सिक्युरिटी या वाहकांचे मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपनीचा ठेका रद्द करून महापालिकेच्या परिवहन बस सेवा म्हणजेच सिटी लिंकचा तिसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
नाशिक महापालिकेची सिटी लिंक ही सेवा तीन वर्षांपूर्वी सुरू झाली. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत या सेवेचा शुभारंभ झाला होता. नाशिक शहरा व्यतिरिक्त महापालिकेच्या हद्दीपासून वीस किलोमीटर अंतरापर्यंत म्हणजेच ओझर, सिन्नर, कसबे सुकेणे, दिंडोरी, गिरणारे, त्र्यंबकेश्वर अशा विविध ठिकाणी ही सेवा दिली जाते दररोज सुमारे एक लाख प्रवासी या बस सेवेचा वापर करतात आणि महापालिकेला सध्या दररोज २७ लाख रुपयांचे उत्पन्न तिकिटाच्या माध्यमातून मिळते आहे.
दरम्यान, महापालिकेने वाहकांच्या पुरवठ्याचा ठेका दिला असून ठेकेदाराने त्यांचे वेतन वेळोवेळी न दिल्याने त्यांनी नऊ वेळा संप केला होता त्यामुळे या ठेकेदाराची सेवा टर्मिनेट करण्याची नोटीस नाशिक महानगर परिवहन महामंडळ म्हणजेच मनपाच्या सिटीलिंकच्या वतीने देण्यात आली होती. तीन वर्षानंतर हा ठेका आज संपुष्टात आला असून आता नवीन ठेकेदार नियुक्त करण्यात आला आहे वेळोवेळी संप करणाऱ्या वाहकांच्या या ठेकेदाराला महापालिकेने आतापर्यंत एक कोटी ३४ लाख रुपयांचा दंड केला केला आहे.