पारंपरिक आखाजी साजरी
By Admin | Published: May 9, 2016 11:27 PM2016-05-09T23:27:07+5:302016-05-09T23:32:47+5:30
संस्कृती : आठ दिवस सुरू असतो महिलांचा उत्सव
पेठ :
दुधाने दूध तापे,
दुधावर पिवळी साय़
माय म्हणे लेकी,
आखाजी येई जाय़
शंकर बसला घोड्यावर,
गौराई चाले पाय पाय़़़़
अक्षय्य तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा वर्षातील महत्त्वाचा सण़ या सणाला शहरी भागात केवळ स्थावर मालमत्ता, सोने, चांदी, दुचाकी व चारचाकी, घरे अथवा चांगल्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त पाहिला जात असताना पेठ-सुरगाणासारख्या आदिवासी तालुक्यात मात्र आखाजी हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करून आदिवासी संस्कृतीची जोपासना केली जात असल्याचे दिसून येते़
महाराष्ट्र राज्य सणांच्या बाबतीत विविधरंगी राज्य समजले जाते़ जसा प्रदेश तसे सण-समारंभ साजरे करण्याची महाराष्ट्रात प्रथा आहे़ असाच माहेरवाशिणीचा महत्त्वाचा समजला जाणारा अक्षय्य तृतीयेचा सण आदिवासी भागात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतो़
साडेतीन मुहूर्तापैकी एक समजला जाणाऱ्या या सणाला आदिवासी भागात मात्र गौराईचा सण म्हणूनही साजरा करतात़ शहरी भागात खरेदी विक्रीसाठी शुभ मानली जाणारी अक्षय्य तृतीया आदिवासींची आखाजी असते़ आखाजीच्या आदल्या दिवशी घरातील कर्ते पुरुष रानात जाऊन घरातील सुना व मुलींसाठी कोडईच्या झाडाच्या लाकडापासून टिपऱ्या तयार करून आणतात, तर लहान मुले याच लाकडापासून भाले, तलवारी तयार करतात़ त्यांना विविध रंगांनी रंगवतात़
सासरी गेलेल्या मुलींसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा समजला जातो़ प्रत्येक सासूरवासीन आखाजीला हमखास माहेरी येत असते़ दुपारनंतर ऊन कमी झाल्यावर घरात ठेवलेली टोपली पूजा करून बाहेर काढली जाते़ उगवलेल्या रोपाच्या टोपल्या फुलांच्या माळांनी सजवल्या जातात़ गावातील
सर्व गौराई मंदिराजवळ एकत्र करून पूजा केली जाते़ डोक्यावर टोपली घेऊन पारंपरिक वाद्य वाजवून
वाजत-गाजत या गौरार्इंची मिरवणूक काढली जाते़ यावेळी महिलावर्ग गौराईच्या पारंपरिक ओव्या म्हणतात़ उगवलेल्या धान्याचे कोवळे तुरे आभूषणे म्हणून डोक्याला, कानात लावले जातात़
सायंकाळी अतिशय भक्तिमय वातावरणात या गौरार्इंचे सार्वजनिक तलाव, नदी अशा ठिकाणी पाण्यात विसर्जन केले जाते़ या उत्सवात गावातील अबालवृद्ध मोठ्या
संख्येने सहभागी होत असतात़ महिला टिपऱ्या खेळतात तर लहान मुले लाकडी भाले व तलवारीचे खेळ खेळताना दिसतात़
विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर टोपलीतील धान्याचे तुरे गावातील लोकांच्या कानाला व डोक्याला लावून त्यांच्याकडून दोन-चार रुपये गोळा केली जातात़ यावेळी महिला पारंपरिक गाणे सादर करतात़
अशा पद्धतीने शहरी भागात अक्षय्य तृतीया केवळ शुभ दिवस म्हणून सोने-चांदीच्या खरेदीसाठी
रांगा लावणाऱ्या धनधांडग्यापेक्षा खऱ्या अर्थाने या सणांचे पावित्र्य जपण्याचे व आदिवासी संस्कृती जतन करण्याचे काम आजही दऱ्याखोऱ्यात केले जात असल्याचे या उत्सवावरून दिसून येते़ (वार्ताहर)