पोलिसांच्या वाहनाला धडक देणारे कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:12 AM2021-06-04T04:12:36+5:302021-06-04T04:12:36+5:30
त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून जनावरे चोरी करणाऱ्या टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली ...
त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून जनावरे चोरी करणाऱ्या टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना जिल्हा न्यायालयात बुधवारी हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
अमृतधाम परिसरातून मंगळवारी पहाटे ठाणे जिल्ह्यातील जनावरे चोरी करणाऱ्या टोळीतील संशयित आरोपी सराज युसूफ काझी, इरफान रमजान शेख, दिलशाद समशोद्दिन अन्सारी, मुल्ला खान पूर्ण नाव माहीत नाही, असे म्हसरूळ शिवारात गाईला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून स्कॉर्पिओत क्रमांक (एमएच ०२ एनए ७७८४) जबरदस्तीने टाकून नेण्याचा प्रयत्न करत होते. सदर माहिती नियंत्रण कक्षाने पोलिसांना कळविली. रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस अंबादास केदार व सहकाऱ्यांनी काळ्या रंगाच्या वाहनाला थांबवण्यासाठी मंडलिक मळ्याजवळ पोलीस गाडी क्रमांक (एमएच १५ ईए ००४७) रस्त्यावर आडवी लावली. त्यावेळी त्याच रस्त्याने जाणारी स्कॉर्पिओ थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने स्कॉर्पिओ वेगाने चालवून अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला व पोलीस वाहनाला धडक देऊन वाहन मुंबईच्या दिशेने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून तिघांना पकडले, तर चालक मुल्ला खान पळून गेला. ताब्यात घेतलेल्यांची चौकशी सुरू केल्यावर त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.