‘एटीएम’ केंद्रात मदत घेणे सेल्समनला पडले ‘महाग’; ६० हजारांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 04:29 PM2019-05-29T16:29:26+5:302019-05-29T16:44:18+5:30
नाशिक : मदतीचा बहाणा करत ‘ एटीएम’ केंद्रात डेबीट कार्डची आदलाबदल करून एका भामट्याने एका कंपनीच्या तरूण सेल्समनला ६० ...
नाशिक : मदतीचा बहाणा करत ‘एटीएम’ केंद्रात डेबीट कार्डची आदलाबदल करून एका भामट्याने एका कंपनीच्या तरूण सेल्समनला ६० हजारांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या भामट्याने त्या तरूणामागे एटीएम केंद्रात उभे राहून ‘सीडीएम’ यंत्रात तो भरणा करत असलेली रक्कम बघितली आणि संधी साधत त्याने हातचलाखीने दिशाभूल करून ‘डेबीट कार्ड’ची आदलाबदल करून घेत फसवणूक केल्याचा प्रकार बोधलेनगर परिसरात घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धनंजय हरिभाऊ ढाकुलकर (२६,रा. शिवाजीनगर)हे एका कंपनीत वसूली अधिकारी म्हणून काम पाहतात. मंगळवारी (दि.२८) सकाळी ते कंपनीच्या कॉस्मेटिक हेअर कलर विक्र ीची वसूली करून बोधलेनगर येथील स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या एटीएम केंद्रामध्ये रोकडचा भरणा करण्यासाठी गेले. यावेळी भरणा करताना त्यांना तांत्रिक अडचण उद्भवली. ढाकुलकर यांनी पाठीमागे असलेल्या एका युवकाची मदत घेतली असता त्या संशयिताने रोकडचा भरणा करून देत डेबीट कार्ड चलाखीने बदलवून घेतले. ढाकूलकर यांच्या हातात कल्पना पाटील नावाच्या महिलेचे डेबीट कार्ड ठेवून त्याने केंद्रातून पोबारा केला. त्यानंतर द्वारका भागातील एटीएममधून भामट्याने ढाकूलकर यांच्या डेबीटकार्ड अन् गोपनीय क्रमांक जो रोकड भरणार करताना लक्षात ठेवला त्याचा वापर करून चाळीस हजार रूपये काढले. ही बाब त्यांच्या लक्षात आली कारण त्यांच्या भ्रमणध्वनीवर बॅँकेकडून लघुसंदेश प्रात झाला. लघुसंदेश वाचताच त्यांच्या पायाखालील वाळू सरकली. त्यांनी तत्काळ बँकेशी संपर्क केला; मात्र तोपर्यंत त्यांच्या बॅँक खात्यातून उर्वरीत २० हजाराची रक्कम अन्य खात्यावर वर्ग करून त्र्यंबकनाका भागातील एटीएम केंद्रात जाऊन तेथून पुन्हा २० हजाराची रोकड काढून घेत ढाकूलकर यांना तब्बल ६० हजारांना गंडा घातला. त्यांनी याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात अज्ञात संशयित भामट्याविरूध्द फसवणूकीची तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक प्रविण शिंदे करीत आहेत.