खेरवाडीजवळ रेल्वे रुळावर सीमेंटचा दगड; दुर्घटना टळली
By admin | Published: February 12, 2017 12:54 AM2017-02-12T00:54:01+5:302017-02-12T00:55:00+5:30
खेरवाडीजवळ रेल्वे रुळावर सीमेंटचा दगड; दुर्घटना टळली
निफाड : मुंबई-भुसावळ मार्गावरील निफाड तालुक्यातील खेरवाडी ते ओढा दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर १५ किलो वजनाचा सिमेंटचा दगड ठेवून घातपाताचा प्रयत्न हावडा कुर्ला एक्स्प्रेसच्या चालकाच्या प्रसंगावधानाने फसला. यामुळे मोठी दुर्घटना टळली.
मुंबईला जाणारी हावडा कुर्ला एक्स्प्रेस शुक्रवारी रात्री १२.४५ वाजेदरम्यान खेरवाडी ओढा रेल्वे स्टेशन दरम्यान पोल क्र . २०२/४ या ठिकाणी रेल्वेच्या ट्रॅकवरील सिमेंटचा मैलाचा दगड क्र . २०२ हा अज्ञात व्यक्तीने रेल्वे रूळावर ठेवलेला होता. हावडा कुर्ला एक्स्प्रेस खेरवाडी ते ओढा या दरम्यानच्या मार्गावरून जात असताना ट्रॅकवर दगड असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने दुरूनच तातडीने ब्रेक लावला परंतु तरीही रेल्वेचे चाक या दगडावर गेले आणि दगडाचे दोन तुकडे झाले. त्यातील एक तुकडा रेल्वे इंजिनच्या जाळीवर येऊन पडल्याने जाळीचा काही भाग तुटला रेल्वे थांबवल्यानंतर चालकाने खाली उतरून परिस्थिती पाहिली आणि नंतर एक्स्प्रेस नाशिकरोड रेल्वे स्टेशनला आणून ही माहिती दिली. शनिवारी सकाळी रेल्वे पोलीस, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, पोलीस उपअधीक्षक वळवी, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मांडवकर, नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक के. एस. निर्मल आणि एटीएस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथकही आणले परंतु संबंधित गुन्हेगारांचा तपास लागला नाही. हे प्रकरण नाशिकरोड रेल्वे स्टेशनला वर्ग करण्यात येणार आहे.
हावडा कुर्ला एक्स्प्रेसच्या चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने तातडीने गाडीचा वेग कमी केल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. या ठिकाणी रेल्वे थांबल्यानंतर रेल्वेतील प्रवाशांना हा प्रकार समजल्यानंतर काहीसे भीतीचे वातावरण झाले होते.
मुंबईत रेल्वे रूळावर पोल ठेवण्याचा प्रयत्न झाला होता, त्यानंतर ग्रामीण भागात झालेला हा प्रकार नेमका कोणत्या अज्ञात व्यक्तीने आणि कशासाठी केला या बाबतचा तपास करण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे.