ग्रामपंचायतीच्या आवारात दफनविधीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:27 AM2017-09-03T00:27:29+5:302017-09-03T00:28:06+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून दफनभूमीसाठी हक्काची जागा असताना ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तिचा ताबा मिळत नसल्याने संतप्त तीनशे ते चारशे आदिवासी महिला व पुरुषांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल करून आवारातच एका वृद्धाचा दफनविधी करण्याचा प्रयत्न केला.
सटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून दफनभूमीसाठी हक्काची जागा असताना ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तिचा ताबा मिळत नसल्याने संतप्त तीनशे ते चारशे आदिवासी महिला व पुरुषांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल करून आवारातच एका वृद्धाचा दफनविधी करण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना बागलाण तालुक्यातील देवळाणे येथे शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.
दरम्यान, प्रभारी तहसीलदार दीपक धिवरे, जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी वेळीच दफनविधीसाठी अन्य ठिकाणी तात्पुरती जागा उपलब्ध करून दिल्याने आदिवासी बांधवांनी सामंजस्याची भूमिका घेत वृद्धावर शांततेत अंत्यसंस्कार केले.
बागलाण तालुक्यातील देवळाणे येथील भिल्ल आदिवासी समाजासाठी दफनभूमीची मोठी समस्या आहे. अनेकवेळा ग्रामसभेत आदिवासींसाठी गावठाणमधून जागा काढून देण्याचा ठराव पारित करण्यात आला. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या ठरावालाच केराची टोपली दाखवल्याचा प्रकार समोर आला आहे. शुक्र वारी रात्री देवळाणे येथील आदिवासी वस्तीत राहणारे रु ंझा पंजा सोनवणे (६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना मुलगा नसल्यामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी संपूर्ण समाज एकवटला होता. शनिवारी सकाळी १० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते .त्यासाठी बाहेरगावातील नातेवाईक ,समाजातील बांधवांनी गर्दी केली होती. अंत्यविधीसाठी युवराज वाघ यांच्या शेतालगत नदीपात्रात तयारी सुरु असतांना त्याला गावातील काही लोकांनी मज्जाव केल्याने उपस्थित समाजबांधव आणि महिलांच्या भावना भडकल्या . संतप्त झालेल्या तीनशे ते चारशे महिला व पुरु षांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयावरच हल्लाबोल केला. आणि कार्यालयाला घेराव घालून आम्हाला दफनभूमीची जागा द्या अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर मृतदेह दफन करू . काही तरु णांनी टिकाव ,फावडे घेऊन खड्डा खोदण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपसरपंच हरी रामदास देवरे ,भाऊसाहेब शिरसाठ आदींनी आदिवासींना बांधवाना शांततेचे आवाहन करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र संतप्त महिला व पुरु ष आपल्या भूमिकेवर ठाम होते. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस पाटलांनी पोलिसांना पाचारण केले. जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आदिवासी बांधवांच्या भावना लक्षात घेऊन जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र चार तास उलटूनही तोडगा निघत नव्हता. दुसरीकडे मृतदेहाची हेळसांड होत असल्यामुळे आदिवासींच्या भावना अधिकच भडकल्या संतप्त जमाव पोलिसांवर चालून आला. हा प्रकार पाहून पोलीस निरीक्षक ठाकूरवाड यांनी तत्काळ प्रभारी तहसीलदार दीपक धिवरे यांना पाचारण केले. धिवरे यांनी उपसरपंच देवरे ,ग्रामसेवक हिरे आणि आदिवासी बांधवांची बैठक घेतली. यावेळी शेतकरी युवराज वाघ यांनी मृतदेहाची हेळसांड होऊ नये म्हणून आपल्या शेतालगत पूर्वीच्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याचे आवाहन करून विधी आटोपून जागेबाबत तोडगा काढू अशी सामंजस्याची भूमिका घेतल्याने अंत्यविधीचा मार्ग मोकळा करण्यात आला.