मनसे नगरसेवकांची शिरगणती
By admin | Published: November 4, 2014 12:14 AM2014-11-04T00:14:56+5:302014-11-04T00:15:57+5:30
फुटीचा संशय : ‘कामे करू, पण पक्ष सोडू नका’; वसंत गिते यांना शह देण्याचा प्रयत्न्
नााशिक : वसंत गिते यांनी प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेक नगरसेवकदेखील त्यांच्या बरोबर जाणार असल्याच्या चर्चेमुळे मनसेने सर्वच नगरसेवकांना तातडीने पाचारण करून ओळखपरेड घेतली. ३३ नगरसेवक यावेळी उपस्थित होते. गिते यांनी पक्षाचा नाही, पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्तेवर काहीही परिणाम होणार नाही. उलट महापौरपद मनसेकडे असल्याने उर्वरित अडीच वर्षांत नागरी कामे करून बॅकलॉग भरून काढू, असे सांगून या नगरसेवकांना एकसंध ठेवण्याचा प्रयत्न पदाधिकाऱ्यांनी केला.
विधानसभा निवडणुकीपूर्वी गिते यांचे नाराजीनामा नाट्य रंगले, तेव्हादेखील गिते समर्थक नगरसेवक राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येणार होते. त्यामुळे अशीच स्थिती निर्माण झाल्यानंतर मुंबईहून चक्रे फिरली आणि तातडीने महापालिकेतील मनसे गटनेता कार्यालयात या नगरसेवकांना तातडीने साडेचार वाजता बैठकीसाठी बोलावण्यात आले. राजीव गांधी भवनातील मुख्यालयात आयोजित या बैठकीस महापौर अशोक मुर्तडक, स्थायी समिती सभापती तथा मनसेचे शहराध्यक्ष राहुल ढिकले, सभागृह नेता शशिकांत जाधव, गटनेता अशोक सातभाई आणि माजी महापौर अॅड. यतिन वाघ उपस्थित होते. यावेळी महापौर मुर्तडक यांनी गिते यांनी पदाचा राजीनामा दिला असून, पक्षाचा नाही. त्यामुळे कोणीही संशय घेऊ नये. पालिकेत मनसेची सत्ता आहे. गेल्या अडीच वर्षांत अडचणी आणि साडेसातशे कोटींचा स्पील ओव्हर यामुळे कामे होऊ शकली नाहीत. परंतु आता मात्र कामे होतील, असे त्यांनी सांगितले. शहराध्यक्ष राहुल ढिकले यांनी गिते हे पक्षाचे नेते असल्याने त्यांना पुन्हा जबाबदारी दिली जावी यासाठी सर्व मिळून प्रयत्न करू असे सांगितले, तर सभागृह नेता शशिकांत जाधव आणि गटनेता अशोक सातभाई यांनी गिते यांच्या राजीनाम्यामुळे पालिकेच्या सत्तेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे सांगितले.
तरीही कोणाला काय भावना व्यक्त करायच्या असतील तर कराव्या, असे सांगितले. परंतु अरविंद शेळके यांनी घंटागाड्यांच्या समस्यांचा पाढा वाचला. त्यानंतर पक्षाबरोबरच सर्वांनी राहावे, असा एकसंधपणा दाखवावा, असे आवाहन केले. (प्रतिनिधी)