अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाइल देण्यास केंद्राचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:19 AM2021-09-08T04:19:49+5:302021-09-08T04:19:49+5:30

अंगणवाडी सेविकांना त्यांच्याकडील माहिती ऑनलाइन भरण्यासाठी २०१९ मध्ये शासनाने पॅनासोनिक कंपनीचे मोबाइल दिले हाेते. सध्या ही कंपनी बंद ...

Center refuses to provide new mobiles to Anganwadi workers | अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाइल देण्यास केंद्राचा नकार

अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाइल देण्यास केंद्राचा नकार

googlenewsNext

अंगणवाडी सेविकांना त्यांच्याकडील माहिती ऑनलाइन भरण्यासाठी २०१९ मध्ये शासनाने पॅनासोनिक कंपनीचे मोबाइल दिले हाेते. सध्या ही कंपनी बंद पडली असून, कंपनीच्या मोबाइलचे पार्टदेखील मिळत नाहीत. त्यातच मोबाइलचा दर्जा अतिशय हलका असल्याने त्याची गॅरंटी व वॉरंटी गेल्या वर्षीच संपुष्टात आलेली आहे. असे असतानाही शासनाकडून पोषण ट्रॅक ॲपवर माहिती भरण्याचा आग्रह अंगणवाडी सेविकाकडे धरला जात आहे. सध्याच्या मोबाइलमध्ये सदरचे ॲप्लिकेशन डाऊनलोड होत नाही. त्यामुळे सेविकांना अन्य दुसऱ्या मोबाइलचा वापर करावा लागत आहे. त्याचा भुर्दंडही सहन करावा लागत आहे. एकीकडे नादुरस्त मोबाइल व दुसरीकडे शासनाकडून दररोज ऑनलाइन माहिती भरण्याची सक्ती केली जात असल्याने वैतागलेल्या राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने संपूर्ण राज्यातच अंगणवाडी सेविकांचे मोबाइल शासनाला परत करण्याचे आंदोलन हाती घेतले आहे. त्याचाच भाग म्हणून नाशिक जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी आपले मोबाइल परत करण्यास सुरुवात केली असून, साडेतीन हजार मोबाइल जमा करण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष ब्रीजपाल सिंह यांनी सांगितले.

अंगणवाडी सेविकांनी मोबाइल जमा केल्यामुळे शासनाकडे दररोज भरली जाणारी ऑनलाइन माहिती भरणेही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे अंगणवाडीच्या कामकाजावरही परिणाम होत आहे. मात्र, अंगणवाडी सेविकांचा माहिती भरण्यास विरोध नाही तर नवीन मोबाइल द्यावा, अशी मागणी केली जात आहे. यासंदर्भात राज्य अंगणवाडी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. ६) मुंबई भेटीवर आलेल्या केंद्रीय महिला व बालविकासमंत्री स्मृती इराणी यांची भेट घेऊन आपल्या मागण्या त्यांच्या पुढे ठेवल्या. मोबाइलच्या नादुरुस्ती व शासनाकडे परत केल्याच्या प्रश्नावर इराणी यांनी अंग काढून घेत ही राज्य सरकारची जबाबदारी असल्याचे सांगितले. तसेच पोषण आहाराची माहिती भरण्यात येणाऱ्या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये इंग्रजीऐवजी मराठी भाषेचा वापर करण्याची मागणीही इराणी यांनी दुर्लक्षिली.

Web Title: Center refuses to provide new mobiles to Anganwadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.