नाशकात केंद्र सरकारचे प्रतिकात्मक पिंडदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 03:53 PM2018-05-28T15:53:04+5:302018-05-28T15:53:04+5:30
दररोज पेट्रोल व डिझेलची दरवाढ होत असून, सरकार या प्रश्नी नाकर्त्यांच्या भूमिकेत असल्याचा आरोप करीत आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडत ‘मोदी सरकार मुर्दाबाद’, ‘इंधन दरवाढ रद्द करा, नाही तर खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा देत केंद्र सरकारचे प्रतिकात्मक पिंडदान केले.
नाशिक : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून केंद्र सरकारचे प्रतिकात्मक पिंडदान केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
दररोज पेट्रोल व डिझेलची दरवाढ होत असून, सरकार या प्रश्नी नाकर्त्यांच्या भूमिकेत असल्याचा आरोप करीत आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडत ‘मोदी सरकार मुर्दाबाद’, ‘इंधन दरवाढ रद्द करा, नाही तर खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा देत केंद्र सरकारचे प्रतिकात्मक पिंडदान केले. यावेळी प्रतिकात्मक पिंड तयार करून ते रस्त्यावर मांडत मोदी सरकारच्या नावाने शिमगा करण्यात आला व पिंडाचे पुजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या आंदोलनाने रस्त्याने जाणाºया येणाºयांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, कर्नाटक निवडणूक संपताच रोखण्यात आलेली इंधन दरवाढ पुन्हा सुरू झाली असून, १४ दिवसात पेट्रोल ३.४९ पैसेतर डिझेल ३.३६ पैसे दराने महागले आहे. इंधनाची दरवाढ गेल्या दोन वर्षातील सर्वात मोठी दरवाढ असून, सरकारला महागाई कमी करण्याचा विसर पडला आहे. सर्वसामान्य जनता हवालदिल झाली असून, कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली आहे. महाराष्टÑाला लागून असलेल्या गुजरातमध्ये ८ ते १० रूपयांनी स्वस्त इंधन मिळते आहे. त्यामुळे सरकारने इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणून दरवाढ तात्काळ कमी करावी अशी मागणी केली आहे. आंदोलनात नंदन भास्करे, आकाश कदम, सागर कुंदे, श्रेयांश सराफ, अतुल डुंबरे, कैलास कळमकर, संदेश टिळे, बापू गागरे, कपिल पवार, सौरभ पवार, प्रशांत बच्छाव, तेजस अहे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.