संशयास्पद : सेंट्रल किचनच्या ठेकेदारांचे बील देण्याची घाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 07:03 PM2020-05-14T19:03:40+5:302020-05-14T19:04:03+5:30
कामातील त्रुटी लक्षात घेऊन बिले रोखण्याची कार्यवाही अपेक्षीत असताना येथे मात्र प्रशासन बिल देण्याची घाई का करीत आहे, असा प्रश्न अजय बोरस्ते यांनी केला आहे.
नाशिक : शहरातील प्राथमिक शाळेतील सुमारे सव्वा लाख मुलांना शालेय पोषण आहार देण्यासाठी सेंट्रल किचनचे तेरा ठेके रद्द करण्यात आले आहेत. आता नव्याने ठेका देण्याची प्रक्रिया सुरू होत असतानाच त्याला शासनाने आक्षेप
घेतला. लगोलग प्रशासनाने देखील जुन्या ठेकेदारांची बील तातडीने अदा करण्यासाठी मुख्यध्यापकांना पत्र पाठविले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात महापालिकेतील विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते यांनी आक्षेप
घेतला असून ही सर्व प्रक्रियाच संशयास्पद असल्याचा त्यांचा आरोप आहे. महापालिकेने गेल्यावर्षी सेंट्रलचे किचनचे ठेके दिल्यानंतर त्यात अनेक प्रकारची अनियमीता असल्याचा नगरसेवकांचा आरोप होता. इतकेच नव्हे तर शाळांना पोषण आहार देताना देखील त्यात मोठा गैरव्यवहार आणि अनियमीतता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. सदरचे ठेके रद्द करतानाच या सर्व प्रकाराची चौकशी झाल्याशिवाय ठेकेदांरांची देयके अदा करू नका अशी मागणी
महासभेत करून तसा ठरावही करण्यात आला होता. दरम्यान, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आपल्या स्तरावर या प्रकरणाची चौकशी करून सेंट्रल किचनला अचानक भेटी देण्यासाठी पथके पाठवली. यावेळी अनेक प्रकारची अनियमितता आढळून आली. त्यामुळे आयुक्तांनी ठेके रद्द केले आहेत. आता आयुक्तांनी नव्याने प्रक्रिया राबविण्यासाठी कार्यवाही सुरू केली असताना कॉँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी नव्याने निविदा काढण्यास स्थगिती आणली. त्यातून वाद सुरू होत नाही तोच आता महापालिकेच्या प्रशासनाने संबंधीत ठेकेदारांना देयके देण्यासाठी मुख्यध्यापकांना पत्र पाठविले आहे सदरच्या ठेकेदारांनी काम योग्य पध्दतीने केलेले नाही. त्यातच कामातील
त्रुटी लक्षात घेऊन बिले रोखण्याची कार्यवाही अपेक्षीत असताना येथे मात्र प्रशासन बिल देण्याची घाई का करीत आहे, असा प्रश्न अजय बोरस्ते यांनी केला आहे. केवळ देयके देण्यातच नव्हे तर एकुणच निविदा काढण्यापासून आणि
चौकशी करण्यापर्यंत सर्वच बाबी संशयास्पद असल्याचे बोरस्ते यांनी सांगितले.