सेंट्रल पार्क एप्रिल अखेर नागरिकांसाठी खुला सीमा हिरेंकडून पाहणी : उद्यानाचे काम पूर्णत्वाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 05:59 PM2021-01-02T17:59:50+5:302021-01-03T00:46:52+5:30
सिडको : सिडकोतील मोरवाडी येथे विकसित होत असलेल्या सेंट्रल पार्कचे काम युद्धपातळीवर सुरू असून, चालू वर्षी एप्रिल महिन्यात नागरिकांसाठी तो खुला होईल. सेंट्रल पार्कच्या कामाची आमदार सीमा हिरे यांनी पाहणी करुन कामाचा प्रगती आढावा घेतला. नाशिक महापालिका व आमदार सीमा हिरे यांच्या विशेष निधीतून सदरचे काम केले जात आहे.
सिडको : सिडकोतील मोरवाडी येथे विकसित होत असलेल्या सेंट्रल पार्कचे काम युद्धपातळीवर सुरू असून, चालू वर्षी एप्रिल महिन्यात नागरिकांसाठी तो खुला होईल. सेंट्रल पार्कच्या कामाची आमदार सीमा हिरे यांनी पाहणी करुन कामाचा प्रगती आढावा घेतला. नाशिक महापालिका व आमदार सीमा हिरे यांच्या विशेष निधीतून सदरचे काम केले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पेलिकन पार्क नावाने प्रलंबित असलेल्या सतरा एकर जागेवर नाशिककरांसाठी सेंट्रल पार्कच्या माध्यमातून उद्यान विकसित केले जात आहे. या उद्यानामध्ये पहिल्या टप्प्यात एन्ट्रस प्लाझामध्ये कार पार्किंग, बस पार्किंग, ऑटोरिक्षा पार्किंग असणार आहे. तिकीट घर, दोन किमीचा जॉगिंग ट्रॅक, सेंट्रल प्लाझामध्ये ॲम्पिथिएटर, वॉटर बॉडी, तसेच ऑर्किडियम असणार आहे. या ऑर्किडियमचा उपयोग शाळा, कॉलेज यांना छोट्या कार्यक्रमासाठी होऊ शकतो, तसेच या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाईसह पुष्पोत्सवपण असणार आहे. नागरिकांसाठी ई-टॉयलेट ही संकल्पना यामध्ये अंतर्भूत आहे. जेणेकरून स्वच्छता राखली जाईल, या बरोबरच लहान मुलांसाठी आधुनिक व मनोरंजनात्मक खेळणी, शहरी मुलांना मातीवर खेळण्याचा आनंद घेता यावा, याकरिता सँड फिल्डचा समावेश असणार आहे. रबर फ्लोरिंग असल्याने मुलांना दुखापत वगैरे होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. या कामाची पाहणी हिरे यांनी केली व स्थानिक नगरसेवकांनी सुचविलेल्या आवश्यक त्या ठिकाणी बदल सुचविले. सदरचा प्रकल्प नागरिकांच्या सेवेत लवकरात लवकर खुला होण्याच्या दृष्टीने मक्तेदार व मनपाचे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. सेंट्रल पार्क नागरिकांच्या सेवेसाठी नवीन वर्षात साधारणत: एप्रिलअखेर खुला होईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रभागाचे नगरसेवक मुकेश शहाणे, नीलेश ठाकरे, छाया देवांग, बाळासाहेब पाटील, शिवाजी बरके, गोविंद घुगे शैलेश साळुंखे, राजपूत, कार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील, उपअभियंता सुनील रौंदळ, शाखा अभियंता प्रवीण थोरात, कारे पाटील आदी उपस्थित होते.