पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यासाठी केंद्रीय पथक उद्या नाशिकमध्ये
By Sandeep.bhalerao | Published: December 27, 2023 07:48 PM2023-12-27T19:48:11+5:302023-12-27T19:49:12+5:30
नियोजित हेलिपॅडची जागा तसेच सभेच्या जागेची निश्चिती गुरुवारी होण्याची शक्यता आहे.
नाशिक : नेहरू युवा केंद्राच्या युवक मेळाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दि.१२ जानेवारी रोजी नाशिक दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या दौऱ्यापूर्वी पंतप्रधान कार्यालयाचे एक पथक नाशिकमध्ये दाखल होत आहेत. बुधवारी रात्री उशिरा पथकाचे आगमन होणार असून गुरुवारी (दि.२८) रोजी पथक नियोजित सभा स्थळांची तसेच हेलिपॅड जागेची पाहणी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा निश्चित मानला जात असून दौऱ्याच्या नियोजनासाठी जिल्हा तसेच पोलिस प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे. यासाठीच्या बैठकादेखील सुरू झाल्या असून यापूर्वी जिल्ह्यात पंतप्रधान मोदी यांच्या झालेल्या कार्यक्रमांच्या नियोजनाचाही अभ्यास केला जात आहे. या दौऱ्यासाठी साधूग्राम, मोदी मैदान तसेच निलगिरी बाग या जागांचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.
पथकाकडून या जागांची पाहणी केली जाणार असल्याचे समजते. नियोजित हेलिपॅडची जागा तसेच सभेच्या जागेची निश्चिती गुरुवारी होण्याची शक्यता आहे. नेहरू युवा केंद्राच्या वतीने दरवर्षी युवा दिनानिमित्त देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रम घेतले जातात. यंदा १२ जानेवारी युवा दिनाचा हा मेळावा नाशिकमध्ये निश्चित करण्यात आला आहे. या दौऱ्यासाठी यंत्रणेने तयारी सुरू केली असतांनाच आता केंद्रीय पथकदेखील दाखल होणार असल्याने पथकाच्या निर्देशानुसार नियोजनाला दिशा मिळणार आहे. त्यामुळे या पथकाचा हा दौरादेखील निश्चित मानला जात आहे. पंतप्रधान मोदी यांचा दौरा हा निश्चित मानला जात असल्याने राज्यभरातून किती युवक येतील, त्यानुसार कार्यक्रमाचे नियोजन करावे लागणार आहे. शहराच्या बाहेरचे मैदान आणि हॅलिपॅड याचे नियोजन असून शक्यतो रस्ते मागे अंतर कमीत कमी असावे, असे नियोजन केले जाणार असल्याचे समजते.