केंद्रीय पथकाकडून शहरातील आरोग्य व्यवस्थेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 01:28 AM2021-04-10T01:28:54+5:302021-04-10T01:33:50+5:30
देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्र ठरले असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय वैद्यकीय पथकाने शुक्रवारी सकाळपासून आडगाव मेडिकल कॉलेज, जिल्हा रुग्णालय तसेच झाकीर हुसेन हॉस्पिटलला प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. केंद्रीय वैद्यकीय विभागाचे सहसंचालक डॉ. पुष्पेंद्र वर्मा आणि सहायक संचालक डॉ. साहिल गोयल यांना मनपा प्रशासन, जिल्हा रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजमधील उपलब्ध सुविधा आणि त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली.
नाशिक: देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्र ठरले असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय वैद्यकीय पथकाने शुक्रवारी सकाळपासून आडगाव मेडिकल कॉलेज, जिल्हा रुग्णालय तसेच झाकीर हुसेन हॉस्पिटलला प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. केंद्रीय वैद्यकीय विभागाचे सहसंचालक डॉ. पुष्पेंद्र वर्मा आणि सहायक संचालक डॉ. साहिल गोयल यांना मनपा प्रशासन, जिल्हा रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजमधील उपलब्ध सुविधा आणि त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली.
या केंद्रीय वैद्यकीय पथकाने गुरुवारी सायंकाळीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला होता. त्यावेळी शहरात ऑक्सिजन बेडअभावी होणारे रुग्णांचे हाल, व्हेंटिलेटरचा तुटवडा, रेमडेसिवीरची उणीव अशा सर्व बाबींवर कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, त्याची माहिती घेतली होती. त्यानंतर शुक्रवारी सकाळीच या वैद्यकीय पथकाने आडगाव मेडीकल कॉलेजमधील कोरोना केंद्र, तेथील लॅबोरेटरीला भेट देऊन त्यांची कार्यपद्धती जाणून घेतली. रेकॉर्ड्स, स्वॅब कुठे कसे ठेवले जातात, त्याबाबतच्या माहितीचाही आढावा कॉलेजच्या डीन डॉ. मृणाल पाटील यांच्याकडून घेतला.
सिव्हिलच्या कोरोना लॅबची पाहणी
मेडीकल कॉलेजनंतर या पथकाने जिल्हा रुग्णालयास भेट दिली. त्यावेळी पथकाने जिल्हा रुग्णालयाचा कोरोना विभाग, कोविड सॅम्पलिंग लॅबोरेटरी अशा सर्व स्थानांना भेट देऊन तेथील कामकाजाची पद्धती जाणून घेतली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील कामकाजाचे पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशनदेखील त्यांनी बघितले. नूतन तसेच रुग्णालयातील बाधितांच्या नातेवाईकांशी चर्चा करुन त्यांची मतेदेखील या पथकाने जाणून घेतली. त्यानंतर पथकाने महापालिकेला भेट देऊन मनपा आयुक्त कैलास जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे तसेच नोडल ऑफीसर डॉ. आवेश पलोड यांच्याशी देखील चर्चा केली.
फळविक्रेत्याची केली तपासणी
आडगाव मेडिकल कॉलेजवरुन परतताना संबंधित पथकाने मुंबई नाक्याजवळ उतरुन अचानकपणे तेथील फळविक्रेत्यांची पाहणी करुन मास्क लावले आहेत की नाही, त्याची तपासणी केली. तसेच एका विक्रेत्याचा मास्क नाकापासून खाली आलेला असल्याने त्याला मास्क व्यवस्थित लावण्यास सांगितले. त्याशिवाय सायंकाळी त्यांनी त्रिमुर्ती चौकातील भाजीबाजाराचीदेखील पाहणी केली.
गोविंदनगर कन्टेन्मेंट झोनला भेट
या पथकाने शहरात नुकतेच मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडलेल्या गोविंदनगरच्या कंटेन्मेंट झोनला भेट दिली. या भेटीदरम्यान पथकाने बाधित नागरिकांशी चर्चा,
मनपाने केलेल्या नोंदी या सर्व बाबींची पडताळणी केली. तसेच
मनपाकडून किती वेळा औषध फवारणी, धुरळा फवारणी झाली याबाबतदेखील पथकाने कसून चौकशी करीत त्याच्या नोंदी करुन घेतल्या.