मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव
By admin | Published: October 19, 2016 12:17 AM2016-10-19T00:17:48+5:302016-10-19T00:27:47+5:30
औरंगाबाद विभागाची बाजी
नाशिक : विद्यार्थ्यांनी आपल्या डोळ्यासमोर विशिष्ट व्यक्तीचा आदर्श ठेवणे आवश्यक असून, जीवनातील आदर्श व्यक्तिमत्त्वामुळेच आपली जडणघडण होत असल्याचे प्रतिपादन चित्रपट अभिनेते अशोक शिंदे यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे आयोजित केंद्रीय युवक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले. या महोत्सवात १८ स्पर्धांपैकी तब्बल ११ स्पर्धेत औरंगाबाद विभागाने यश मिळवत या महोत्सवात बाजी मारली.
मंगळवारी (दि. १८) गंगापूर येथील विद्यापीठाच्या आवारात या युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, यश आणि अपयश प्रत्येकाच्या वाट्याला येत असल्याने आपण जे काही आहोत त्यातूनच विश्व निर्मिती करायला हवी, असे आवाहन केले. जीवनात यशाची शिखरे पादाक्रांत करायची असल्यास योग्य संधी आणि योग्य वेळ मिळून यावी लागते, असेही शिंदे यांनी नमूद केले तसेच शिंदे यांनी चित्रपटसृष्टीतील वेगवेगळे अनुभव कथन करून आपला जीवनप्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगताना कलाकार आणि खेळाडूंसाठी विविध संधी उपलब्ध असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना युवक महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या.
या केंद्रीय युवक महोत्सवात राज्यभरातून विविध अभ्यास केंद्रातील १०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या महोत्सवाअंतर्गत एकांकिका स्पर्धा, मूक अभिनय, विडंबन नाट्य्, गायन, वादन, चित्रकला, रांगोळी, फोटोग्राफी, वादविवाद, नृत्य, वक्तृत्व आणि प्रश्नमंजूषा अशा विविध १८ प्रकारांच्या स्पर्धा संपन्न झाल्या. या युवक महोत्सवात किरण लद्दे, आशिष रानडे, संगीता पेठकर, बाळ नगरकर, मिलिंद देशमुख यांनी परीक्षण केले. सोमवारी संध्याकाळी केंद्रीय युवक महोत्सवाचा उत्साहात समारोप झाला. यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञानपीठाचे प्र-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर आणि अभिनेते अशोक शिंदे यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी आगामी नोव्हेंबर महिन्यात औरंगाबाद येथे होणाऱ्या ‘इंद्रधनुष्य’ स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
दरम्यान, महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, प्रभारी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर आणि विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण आणि बहि:शाल केंद्राच्या प्रमुख डॉ. विजया पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कुलकर्णी, तर आभार डॉ. विजया पाटील यांनी मानले. (प्रतिनिधी)