सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त प्रयोगांचे शतक‘

By admin | Published: August 8, 2016 12:07 AM2016-08-08T00:07:09+5:302016-08-08T00:07:32+5:30

जय जय गौरीशंकर’ : येत्या रविवारी होणार नाटकाची पन्नाशी पार

Centuries of the 'Golden Jubilee Year' | सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त प्रयोगांचे शतक‘

सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त प्रयोगांचे शतक‘

Next

धनंजय वाखारे  नाशिक
गोव्यातील मंगेशीच्या देवळात १९६६ साली अवघ्या सहा वर्षांच्या ज्ञानेश पेंढारकरांच्या हस्ते विद्याधर गोखले लिखित ‘जय जय गौरीशंकर’ या संगीत नाटकाचा मुहूर्त पार पडला आणि १४ आॅगस्ट १९६६ रोजी बिर्ला मातोश्री सभागृहात पहिला प्रयोग हाउसफुल्ल होत तेथून सुरू झालेला हा प्रवास पन्नास वर्षांचा टप्पा ओलांडला तरी आजतागायत सुरू आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘आर्यादुर्गा क्रिएशन्स’ या संस्थेने हे नाटक नव्याने रंगभूमीवर आणले आणि पन्नाशीची उमर गाठलेल्या ‘जय जय गौरीशंकर’चा शंभर प्रयोगांचा संकल्प कोणत्याही शासन अनुदानाविना पूर्ण केला. नाटकाच्या पन्नास वर्षांच्या प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे मूळ प्रयोगात शंकराची भूमिका साकारणारे पंडित राम मराठे यांचे सुपुत्र मुकुंद मराठे यांनी सुवर्णमहोत्सवी वर्षात शंकराचीच भूमिका साकारत वर्तुळ पूर्ण केले आहे.
साठोत्तर संगीत नाटकांच्या सुवर्णयुगातील ‘जय जय गौरीशंकर’ हे नाटक एक सुवर्णपान. पत्रकार आणि ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले यांच्या प्रतिभाशाली लेखणीतून पाझरलेले हे नाटक सर्व कलांचा अधिष्ठाता नटेश्वर अर्थात महादेवाच्या जीवनातील काही निवडक प्रसंगांमुळे प्रेक्षकांच्या मनावर गेल्या पन्नास वर्षांपासून अधिराज्य गाजवत आहे. शिवलीलामृतातील १४ व्या अध्यायाच्या आधारे आणि काही शिवकथांच्या संदर्भानुसार गोखलेंनी लिहिलेल्या या नाटकाचा पहिला प्रयोग १४ आॅगस्ट १९६६ रोजी मातोश्री बिर्ला सभागृहात भालचंद्र पेंढारकर यांच्या ‘ललितकलादर्श’ या संस्थेने सादर केला. ‘नारायणा रमा रमणा’, ‘निराकार ओंकार’, ‘कशी नाचे छमाछम’, ‘सावज माझं गवसलं’, ‘भरे मनात सुंदरा’ या गीतांबरोबरच ‘सप्तसूर झंकारित बोले’ या नांदीमुळे ‘गौरीशंकर’ने यशाचे शिखर गाठले. आजही ही गीते प्रेक्षकांच्या ओठी गुणगुणतांना आपण पाहतो. संगीतभूषण पंडित राम मराठे (शंकर), नटवर्य भालचंद्र पेंढारकर (नारद) आणि संगीतरत्न प्रसाद सावकार (शंगी) यांच्या गायनाने व अभिनयाने नटलेल्या या नाटकाचे अडीच हजारांहून अधिक प्रयोग झाले.
साधारणपणे दोन वर्षांपूर्वी ‘जय जय गौरीशंकर’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाची चर्चा सुरू झाली तेव्हा मुंबईच्या आर्यादुर्गा क्रिएशन्स या संस्थेने पुढाकार घेत नाटक पुनश्च रंगमंचावर तितक्याच दिमाखात आणण्याचा निर्णय घेतला. निर्माते सुनील जोशी यांनी त्यासाठी टीम जुळवून आणली आणि पंडित राम मराठे यांचे सुपुत्र मुकुंद मराठे व नात प्राजक्ता मराठे, सुनील दातार, ज्ञानेश पेंढारकर या कलावंतांच्या साथीने संगीत रंगभूमीला जान आणली. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नाटकाचे शंभर प्रयोग करायचेच हा ध्यास साऱ्या कलावंतांनी घेतला आणि म्हणता-म्हणता नाटक शंभराच्या भोज्याला पोहोचले. त्यासाठी अनेकांच्या मदतीचे हात लागले. मराठी रंगभूमीवर एखाद्या नाटकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शंभर प्रयोग होण्याची घटना पहिलीच मानली जात आहे.

Web Title: Centuries of the 'Golden Jubilee Year'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.