येवल्यातील आराेग्य यंत्रणेची सीईओंकडून झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 01:16 AM2021-03-24T01:16:35+5:302021-03-24T01:17:52+5:30

येवला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत चालले असतानाही त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून पाहिजे त्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग तसेच रुग्णांचा शोध घेतला जात नसल्याचे पाहून मंगळवारी जिल्हा  परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी चांगलीच झाडाझडती घेतली. 

The CEOs of the health system in Yeola have been sacked | येवल्यातील आराेग्य यंत्रणेची सीईओंकडून झाडाझडती

येवल्यातील आराेग्य यंत्रणेची सीईओंकडून झाडाझडती

Next
ठळक मुद्देअधिकाऱ्याचा पदभार काढला : वैद्यकीय अधीक्षकांवर कारवाई

नाशिक : येवला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत चालले असतानाही त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून पाहिजे त्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग तसेच रुग्णांचा शोध घेतला जात नसल्याचे पाहून मंगळवारी जिल्हा  परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी चांगलीच झाडाझडती घेतली. 
तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केल्याने त्यांचा पदभार तत्काळ काढण्यात आला, तर वैद्यकीय अधीक्षकांवरही कारवाई करण्याचे आदेश जागीच देण्यात आले.     
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, त्याला अटकाव करण्यासाठी आरोग्य यंत्रणा, ग्रामपंचायत विभागाला उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असूनही त्याचा फारसा परिणाम दिसत नसल्याचे पाहून मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी येवला येथे अचानक भेट देऊन अधिकाऱ्यांची बैठक व काही ठिकाणांना भेट देऊन पाहणी केली. 
त्यात आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा निदर्शनास आल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांचा पदभार काढून घेत तो डॉ. कातकाडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात  आला, तर येवला ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा कुप्पास्वामी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले. 
या दोघांबरोबरच नगरसूल येथील ग्रामीण रुग्णालयातील अधीक्षक डॉ.  सूर्यवंशी हेदेखील तडाख्यातून सुटले नाहीत. त्यांच्यावरही कारवाई 
करण्याचे आदेश देण्यात आले 
आहेत. 
मास्कचा वापर व सुरक्षित अंतर पाळण्याबाबत ग्रामसेवकांनी दक्ष राहून मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, ग्रामसेवकांनी दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. हॉटस्पॉट ठरलेल्या नगरसूल ग्रामपंचायतीच्या हद्दीत अधिकाधिक रुग्ण तपासणी मोहीम राबविण्यात यावी व येवल्याच्या उपजिल्हा रुग्णालयात डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू करण्याच्या सूचनाही बनसोड यांनी दिल्या. 
बैठकीस प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते.
अधिकाऱ्यांना केल्या विविध सूचना
यावेळी घेण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत लीना बनसोड यांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची दररोज माहिती संकलित करून ती ऑनलाइन अपलोड करण्यात यावी, अशा व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या किमान ३० लोकांची रॅपिड ॲन्टिजेन तपासणी केली जावी, रुग्णाच्या रहिवास क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून त्यावर लक्ष केंद्रित करावे, नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानांवर कारवाई करावी, गृहविलिगीकरणात उपचार घेणाऱ्या प्रत्येक रुग्ण घरी आहे किंवा नाही याची खात्री करावी तसेच त्याच्याशी संपर्कात राहावे अशा व्यक्तींकडून नियमांचे उल्लंघन होत असेल तर तत्काळ त्याला कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. 

Web Title: The CEOs of the health system in Yeola have been sacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.