नागलवाडीची शाळा होणार आठवीपर्यंत सीईओेंची माहिती
By admin | Published: February 8, 2015 12:26 AM2015-02-08T00:26:29+5:302015-02-08T00:27:10+5:30
नागलवाडीची शाळा होणार आठवीपर्यंत सीईओेंची माहिती
नाशिक : आठ दिवसांपूर्वीच नागलवाडीला राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भेट दिल्यानंतर आता लगेचच त्यांनी केलेल्या एकेक सूचना अंमलात आणण्याचे काम प्रशासनाच्या वतीने अंमलात आणण्याचे काम सुरू झाले असून, राज्यपालांच्याच सूचनेनुसार जिल्हा परिषदेची शाळा पहिली ते दहावीपर्यंत करण्याचाच एक भाग म्हणून यावर्षापासून ही शाळा चवथीपासून पाचवीपर्यंत करण्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी दिली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी नागलवाडीतील प्राथमिक शाळेसह अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीस भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची व आदिवासी बांधवांशी थेट संवाद साधला होता. त्यात ग्रामस्थांसह महिला व बालकांनी विविध मागण्या केल्या होत्या. त्याच गावातीलच विद्यार्थ्यांनी गावात चवथीपर्यंतच शाळा असल्याने पाचवीपासून पुढे शिक्षण घेण्यासाठी नजीकच्या गिरणारे गावात पायपीट करून जावे लागते. तसेच विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान नाही की पुस्तके वाचण्यासाठी ग्रंथालय नाही. त्यामुळे गावातील शाळा दहावीपर्यंत करावी आणि गावात स्कूलबस सुरू करण्याची मागणी केली होती. राज्यपालांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते. नागलवाडीत असलेली जिल्हा परिषदेची चवथीपर्यंतची शाळा आता पाचवीपर्यंत करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. लवकरच नैसर्गिक तुकड्या वाढीनुसार नागलवाडी गावातच आठवीपर्यंत प्राथमिक शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे सुखदेव बनकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)