घरकुल योजनेतील नागरिकांना पोटाचे विकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:31 AM2019-06-03T00:31:05+5:302019-06-03T00:31:35+5:30
वडाळा गावातील घरकुल योजनेसह परिसरात गेल्या दहा दिवसांपासून पावसाळ्यापूर्वीच दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना स्वखर्चाने शुद्ध पिण्याच्या पाण्याचा जार विकत आणून आपली तहान भागवावी लागत आहे.
इंदिरानगर : वडाळा गावातील घरकुल योजनेसह परिसरात गेल्या दहा दिवसांपासून पावसाळ्यापूर्वीच दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना स्वखर्चाने शुद्ध पिण्याच्या पाण्याचा जार विकत आणून आपली तहान भागवावी लागत आहे. या संदर्भात तक्रारी करूनही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे त्याकडे लक्ष न गेल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या घरकुल योजनेत ७२० कुटुंबे वास्तव्यास आहेत. गेल्या दहा दिवसांपासून या परिसरात पाणीपुरवठा विभागाच्या वतीने दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी महापालिकेचे पाणी पिण्यास नकार देऊन आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता विकतचे पाणी आणून त्यावर आपली व कुटुंबीयांची तहान भागविण्यावर भर दिला आहे. काही नागरिकांना या दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार जडले असून, या संदर्भात महापालिकेकडे तक्रार करूनही दूषित पाणीपुरवठा बंद करण्यात आलेला नाही. दुसरीकडे विकतचे पाणी घेऊन तहान भागविताना गोरगरिब कुटुंबांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
गेल्या दहा दिवसांपासून घरकुल योजना परिसरात दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा केला जात असून, त्यामुळे नागरिकांना पोटाच्या विकारांना सामोरे जावे लागत आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे होत असलेल्या आर्थिक व मानसिक त्रासाने नागरिक त्रस्त झाले आहेत.
- संतोष शिलावट