इंजिनियरींगसाठी 13 ते 23 एप्रिलदरम्यान एमएचटी सीईटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 12:51 PM2020-01-14T12:51:36+5:302020-01-14T13:10:11+5:30
विविध प्रकारच्या व्यावसायिक व तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असून, महाराष्ट्र राज्य प्रवेशपरीक्षा कक्षाने (सीईटी सेल) या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार १३ ते १७ एप्रिल व २० ते २३ एप्रिल २०२० या कालावधीत एमएचटी सीईटी परीक्षा होणार आहे.
नाशिक : एमबीए, फार्मसी, इंजिनिअरिंग, हॉटेल मॅनेजमेंटसह विविध प्रकारच्या व्यावसायिक व तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असून, महाराष्ट्र राज्य प्रवेशपरीक्षा कक्षाने (सीईटी सेल) या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.
महासीईटीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, इंजिनियरिंग, बी. टेक, बी. फार्मसी, फार्म डी, कृषी पदवी, मत्सशास्त्र, दुग्ध तंत्रज्ञान आदी अभ्यासक्रमांसाठी १३ ते १७ एप्रिल व २० ते २३ एप्रिल २०२० या कालावधीत एमएचटी सीईटी परीक्षा होणार आहे. तर एमबीए आणि एमएमएस या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी १४ आणि १५ मार्च रोजी प्रवेशपरीक्षा होणार आहे. एमसीएसाठी २८ मार्चला प्रवेशपरीक्षा होणार आहे. एमएससी, हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी पदवी, स्थापत्य पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी १० मे व हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी १६ मे रोजी प्रवेशपरीक्षा होणार असल्याची माहिती राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षांच्या तारखांची पूर्वकल्पना यावी, यासाठी सीईटी सेलकडून उच्च शिक्षणाच्या आठ व्यावसायिक आणि तंत्रशिक्षणाच्या सहा अभ्यासक्रमांचे संभाव्य वेळापत्रक महिनाभरापूर्वीच जाहीर केले आहे.