एमसीए प्रवेशासाठी २३ मार्चला सीईटी परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 12:46 AM2019-02-12T00:46:23+5:302019-02-12T00:47:35+5:30
एमसीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी अनिवार्य असून, राज्य शासनातर्फे येत्या दि. २३ मार्च रोजी प्रवेशपरीक्षा घेतली जाणार आहे.
नाशिक : एमसीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी अनिवार्य असून, राज्य शासनातर्फे येत्या दि. २३ मार्च रोजी प्रवेशपरीक्षा घेतली जाणार आहे. सीईटीसाठी आॅनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू असून, इच्छुक विद्यार्थ्यांना २२ फेब्रुवारीपर्यंत महासीईटी संकेतस्थळावर आॅनलाइन अर्ज करता येणार आहेत. आॅनलाइन अर्ज व प्रवेशपरीक्षेविषयी डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटमध्ये मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती इन्स्टिट्यूटच्या संचालक डॉ. प्रिती कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
एमबीएसह एमसीए या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी उत्तीर्ण असणे अनिवार्य असते. सीईटी न दिलेल्या विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी महासीईटी या संकेतस्थळावर दि. २२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करून परीक्षा देणे आवश्यक आहे, तर एमबीए सीईटीसाठी दि. १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार असून, ही परीक्षा दि. ९ व १० मार्चला होणार आहे. वर्ष २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी सीईटी परीक्षचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एमसीएसाठी दि. २३ मार्च रोजी परीक्षा होणार असून, या परीक्षेचा निकाल दि. १५ एप्रिलला जाहीर होण्यार आहे. सीईटी देणारे विद्यार्थी शासनाच्या विविध सवलती व शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात. त्यामुळे एमसीए आणि एमबीए अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याचे आवाहन उपसंचालक डॉ. श्रीराम झाडे यांनी केले आहे. यावेळी प्रा. संजय साळवे, प्रा. महेश कुलकर्णी, प्रा. सतेज चिटकुले, प्रा. वैशाली निकम आदी उपस्थित होते.