चाडेगावच्या मळ्यात बिबट्या आला पिंजऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 02:07 PM2019-07-10T14:07:00+5:302019-07-10T14:11:46+5:30
एकलहरे, चाडेगाव शिवारात ऊसशेतीचे प्रमाण अधिक आहे. तसेच बिबट्याला खाद्यही सहजरित्या गावांच्या वेशीवर उपलब्ध होत असल्यामुळे या भागातील नैसर्गिक नाले, ऊसशेती, कालव्यांच्या परिसरात बिबट्यांचा संचार आहे.
नाशिक : एकलहरेजवळील मौजे चाडेगाव शिवारात एका शेतामध्ये पुर्ण वाढ झालेला नर बिबट्यालावनविभाग पश्चिम नाशिकच्या रेस्क्यू पथकाने बुधवारी (दि.१०) सकाळी सुरक्षितरित्या रेस्क्यू केले. यावेळी बघ्यांच्या झालेल्या गर्दीमुळे मोहिमेला अडथळा निर्माण झाला होता.
एकलहरे, चाडेगाव शिवारात ऊसशेतीचे प्रमाण अधिक आहे. तसेच बिबट्याला खाद्यही सहजरित्या गावांच्या वेशीवर उपलब्ध होत असल्यामुळे या भागातील नैसर्गिक नाले, ऊसशेती, कालव्यांच्या परिसरात बिबट्यांचा संचार आहे. मागील काही दिवसांपासून येथील शेतमळ्यांमध्ये बिबट्या शेतमजूरांना दर्शन देत होता. त्यामुळे या भागात पिंजरा लावण्याची मागणी रहिवशांकडून जोर धरू लागली होती. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पुर्व पाहणी करत बिबट्याचा अंदाज बांधला. मंगळवारी सकाळी या भागात लावलेल्या एका पिंज-यात बिबट्या भक्ष्याच्या शोधात अडकला अन् नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. वनरक्षकांना शेतकऱ्यांनी बिबट्या पिंज-यात आल्याची माहिती कळविली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे, वनपरिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी, वनरक्षक गोविंद पंढरे आदिंनी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याचा पिंजरा सुरक्षितरित्या रेस्क्यू व्हॅनमध्ये ठेवून बघ्यांच्या गर्दीतून गंगापूर रोपवाटिकेच्या दिशेने हलविला.नागरिकांनी सावधगिरीने शेतीवरील कामे उरकावी. सकाळी सुर्योदयानंतरच शेतीवर जावे व सायंकाळी सुर्यास्तापुर्वी शेतीचा परिसर सोडावा, असे आवाहन भोगे यांनी केले आहे.