नवरात्रोत्सवाच्या तोंडावर ‘चेन स्नॅचर’ सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2021 01:46 AM2021-10-07T01:46:04+5:302021-10-07T01:47:13+5:30

शहर व परिसरात सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातला असून, या सोनसाखळी चोरांना आवरण्यास पोलिसांना यश येताना दिसून येत नाही. मागील चार दिवसांपासून शहरात दररोज चेन स्नॅचिंगच्या घटना घडत आहेत. मंगळवारी दिवसभरात दोन पादचारी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वार सोनसाखळी चोरांनी हिसकावून पोबारा करत पोलिसांना पुन्हा आव्हान दिले आहे.

‘Chain Snatcher’ activated on the eve of Navratri | नवरात्रोत्सवाच्या तोंडावर ‘चेन स्नॅचर’ सक्रिय

नवरात्रोत्सवाच्या तोंडावर ‘चेन स्नॅचर’ सक्रिय

Next
ठळक मुद्देबारा तासांत दोन लाखांचे दागिने लुटले

नाशिक : शहर व परिसरात सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातला असून, या सोनसाखळी चोरांना आवरण्यास पोलिसांना यश येताना दिसून येत नाही. मागील चार दिवसांपासून शहरात दररोज चेन स्नॅचिंगच्या घटना घडत आहेत. मंगळवारी दिवसभरात दोन पादचारी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वार सोनसाखळी चोरांनी हिसकावून पोबारा करत पोलिसांना पुन्हा आव्हान दिले आहे. ऐन नवरात्रोत्सवाच्या तोंडावर शहरात सोनसाखळी चोर सक्रिय झाल्याने महिलावर्गात दहशतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत उपनगरांमध्ये चोरट्यांकडून महिलांचे दागिने हिसकावून पळ काढला जात होता. मात्र, मंगळवारच्या दोन्ही घटना शहराच्या मध्यवर्ती व गजबजलेल्या परिसरात घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. चांडक सर्कल येथे तिडके कॉलनी पोलीस चौकी असून, या चौकीपासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर कुटे मार्गावरुन पायी जाणाऱ्या सुजाता दीपक निखाडे (२९, रा. कलानगर, दिंडोरी रोड) यांच्या गळ्यातील २४ ग्रॅम वजनाचे १ लाख १८ हजार ८४९ रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून पलायन केल्याची घटना सकाळी पावणेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी निखाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुंबई नाका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या घटनेत रेखा प्रकाश शिवले (४२, रा. पंपिग स्टेशन, गंगापूर रोड) या मंगळवारी (दि. ५) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पंपिग स्टेशन रोडवरून पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकी चोरट्याने रेखा यांच्या गळ्यातील २ तोळे वजनाचे ७० हजार रुपयांचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनांनी शहरातील पोलीस गस्तीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

--इन्फो--

काळ्या रंगाची ‘एफ-झेड’ सुसाट; चोरटे मोकाट

मागील काही महिन्यांपासून शहरात सोनसाखळी चाेरीच्या गुन्ह्यात काळ्या रंगाची ‘एफ झेड’ मॉडेलची स्पोर्ट्स बाईक सुसाट चालवत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरटे हिसकावून गायब होत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी कॉलेजरोडवरील घटनेतसुध्दा अशाच प्रकारच्या काळ्या रंगाची एफझेड दुचाकी तसेच कोणार्कनगरच्या घटनेतसुध्दा अशाच वर्णनाची दुचाकी असल्याचे फिर्यादीने सांगितले होते. मंगळवारी घडलेल्या या दोन्ही घटनांमध्ये वापरलेल्या दुचाकीचे वर्णनही काळ्या रंगाची एफझेड दुचाकी असे समोर आले आहे.

Web Title: ‘Chain Snatcher’ activated on the eve of Navratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.