VIDEO: नाशिकमध्ये ऐन गणेशोत्सवात हेल्मेटधारी चेन स्नॅचर्सचा धुमाकूळ; सहा दिवसांत सहा घटना
By अझहर शेख | Published: September 6, 2022 02:56 PM2022-09-06T14:56:39+5:302022-09-06T14:57:30+5:30
शहरात ऐन गणेशोत्सवात हेल्मेटधारी चेन स्नॅचर्सकडून धुमाकूळ घातला जात आहे.
नाशिक :
शहरात ऐन गणेशोत्सवात हेल्मेटधारी चेन स्नॅचर्सकडून धुमाकूळ घातला जात आहे. सणासुदीच्या काळात महिला दागिने परिधान करुन घराबाहेर पडतात, यामुळे सोनसाखळी चोर सक्रीय झाले आहे. टाकळीरोडनंतर सोमवारी (दि.५) सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास येवलेकर मळा-विसेमळा रस्त्यावर एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली.
VIDEO: नाशिकमध्ये ऐन गणेशोत्सवात हेल्मेटधारी चेन स्नॅचर्सचा धुमाकूळ; सहा दिवसांत सहा घटना pic.twitter.com/zqbzNu2Gmj
— Lokmat (@lokmat) September 6, 2022
गणेशोत्सवात शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून गस्तदेखील वाढविण्यात आली आहे. तरीही सोनसाखळी चोर सर्रासपणे वृद्ध महिलांना वेगवेगळ्या भागात लक्ष्य करत आहेत. सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास संध्या राघवेंद्र अंकलगी (६६,रा. आनंदवन कॉलनी, कॉलेजरोड) या पायी जात होत्या. यावेळी त्यांच्यासमोरून काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीने दोघे संशयित तरुण आले. त्यांनी अंकलगी यांच्या उजव्या बाजूने दुचाकी घेऊन काही सेकंद थांबले आणि पाठीमागे बसलेल्या संशयित चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ४ तोळे वजनाचे मंगळसुत्र हिसकावून पोबारा केला. दुचाकीचालकाने डोक्यात हेल्मेट परिधान केलेले होते. त्याच्या पाठीमागे बसलेल्या युवकाने डोक्यात टोपी घातलेली व गळ्यात लहान बॅग अडकविलेली होती. ही संपुर्ण घटना येथील एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सोनसाखळी हिसकावल्याचे लक्षात येताच अंकलगी यांनी आरडाओरड केली व त्यांच्या पाठीमागे धाव घेतली. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या दोन तरुणांच्याही हा प्रकार लक्षात आला. त्यांनी वृद्धेला विचारले असता त्वरित त्या दिशेने दुचाकीने पाठलाग केला मात्र दोघे सोनसाखळी चोर बॉईज टाऊन शाळेपासून नेमके कुठल्या दिशेने गेले ते लक्षात येऊ शकले नाही.
याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनसाखळी चोरांनी पुन्हा एकदा भद्रकालीसह सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकांना आव्हान दिल्याचे बोलले जात आहे
वृद्ध महिला ‘सॉफ्ट टार्गेट’
येवलेकर मळ्यासह टाकळीरोडवरच्या घटनेतही वृद्ध महिलेला लक्ष्य करण्यात आले. टाकळीरोडवरून विनिता विलास भिंगे (६४,रा.जुनी पंडीत कॉलनी) पायी जात होत्या. यावेळी अचानकपणे दोन तरुण हे दुचाकीने त्यांच्याजवळ आले. त्यांनी डोक्यावर हेल्मेट परिधान केलेले होते. दुचाकीचालकाच्या पाठीमागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे तीन तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावली. रविवारी (दि.४) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात सोनसाखळी चोरांविरुद्ध जबरी लूटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.