सभापतिपदासाठी सेना-भाजपात लढत
By admin | Published: April 7, 2017 02:19 AM2017-04-07T02:19:55+5:302017-04-07T02:20:04+5:30
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी भाजपाकडून शिवाजी गांगुर्डे, तर विरोधकांकडून शिवसेनेचे दत्तात्रेय सूर्यवंशी यांनी गुरुवारी (दि.६) उमेदवारी अर्ज दाखल केले
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी भाजपाकडून शिवाजी गांगुर्डे, तर विरोधकांकडून शिवसेनेचे दत्तात्रेय सूर्यवंशी यांनी गुरुवारी (दि.६) उमेदवारी अर्ज दाखल केले. स्थायी समिती सभापतिपदासाठी शुक्रवारी (दि.७) सकाळी ११ वाजता निवडणूक घेण्यात येणार आहे. समितीवर भाजपाचे स्पष्ट बहुमत असल्याने शिवाजी गांगुर्डे यांची सभापतिपदी निवड निश्चित आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी गुरुवारी सकाळी ११ ते १ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. भाजपाकडून प्रामुख्याने कॉँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले व पाच वेळा महापालिकेत निवडून आलेले शिवाजी गांगुर्डे, मनसेतून भाजपात दाखल झालेले व तीन वेळा निवडून आलेले शशिकांत जाधव आणि दोन वेळा निवडून आलेल्या अलका अहिरे यांच्यात उमेदवारीसाठी चुरस होती. सकाळी पक्षश्रेष्ठींकडून शिवाजी गांगुर्डे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर गांगुर्डे यांनी सभापतिपदासाठी एकूण चार अर्ज दाखल केले. त्यावर सूचक म्हणून महापौर रंजना भानसी, उद्धव निमसे, अलका अहिरे व जगदीश पाटील, तर अनुमोदक म्हणून उपमहापौर प्रथमेश गिते, संभाजी मोरुस्कर, हिमगौरी अहेर व रुची कुंभारकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या. गांगुर्डे यांनी नगरसचिव ए. पी. वाघ यांच्याकडे अर्ज दाखल केला. त्याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, गटनेता संभाजी मोरुस्कर, माजी शहराध्यक्ष विजय साने, उद्धव निमसे आदि उपस्थित होते. त्यानंतर, विरोधकांमार्फत शिवसेनेचे दत्तात्रेय सूर्यवंशी यांनी सभापतिपदासाठी २ अर्ज दाखल केले. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून भागवत आरोटे व संतोष गायकवाड, तर अनुमोदक म्हणून मनसेचे गटनेते सलीम शेख व सेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. स्थायी समितीवर भाजपा-९, शिवसेना-४, कॉँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे यांचा प्रत्येकी एक सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. स्थायीवर भाजपाचे स्पष्ट बहुमत असल्याने शिवाजी गांगुर्डे यांची निवड निश्चित आहे. शुक्रवारी (दि.७) सकाळी ११ वाजता अपर आयुक्त जोतिबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात येणार असून, त्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)