युवती या तेजोमय भारताची चैतन्यशक्ती
By admin | Published: December 14, 2015 12:10 AM2015-12-14T00:10:23+5:302015-12-14T00:15:46+5:30
यामिनी जोशी : राष्ट्रसेविका समितीतर्फे युवती संमेलन; जिल्ह्यातील ७५० युवतींचा सहभाग
नाशिक : मुलींकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनमुळे पालकांच्या काळजीत भर पडली आहे़ या अतिकाळजीपोटी पालक सतत छायेप्रमाणे आपल्या मुलींसोबत असतात़ मात्र पालकांची ही मानसिकताच मुलींना परावलंबित्वाकडे घेऊन चालली आहे़ मुलींना व्यावहारीक शिक्षणाबरोबरच पुढे जाण्यासाठी आत्मशक्तीची आवश्यकता असून, ती जागृत करण्याचे काम आता पालकांना करावे लागणार आहे़ कारण, आत्मशक्ती जागृत झालेल्या युवती या तेजोमय भारताची चैतन्यशक्ती आहेत, असे प्रतिपादन परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी केले़
के़टी़एच़एम. महाविद्यालयात राष्ट्रसेविका समिती व स्वातंत्र्यलक्ष्मी राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीच्या वतीने संघटनेच्या सहस्त्रचंद्रदर्शन पर्वाच्या निमित्ताने एकदिवसीय युवती संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते़ या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून जोशी बोलत होत्या़ पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, सद्यस्थितीत मुलींना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी व्यावहारिक शिक्षण अत्यंत गरजेचे आहे़ योगविद्या धामच्या मानद प्राचार्य आशा वेरूळकर यांनी मार्गदर्शन करताना युवतींनी ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला़
राष्ट्रसेविका समितीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य मंजिरी कोल्हटकर यांनी आजच्या तरुणींनी स्वकेंद्रितपणातून बाहेर काढून ‘स्व’त्वाची जाणीव करून देण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे़
या संमेलनाचा समारोप ‘समितीचे ८० वर्षांचे योगदान’ या विषयावर व्याख्यानाने झाला़ यामध्ये राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाहिका अलका इमानदार यांनी तरुणींना मार्गदर्शन केले तसेच वर्षभर अशा प्रकारची संमेलने घेण्याचा मनोदय व्यक्त केला़ या संमेलनात जिल्ह्यातील सुमारे ७५० युवतींनी सहभाग घेतला होता़
संमेलनाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रसेविका समिती व राणी लक्ष्मी स्मारक समितीचे पदाधिकारी व सदस्यांनी विशेष प्रयत्न केले़ (प्रतिनिधी)