पैशासाठी शेतकऱ्याच्या बॅँकेत चकरा
By admin | Published: February 18, 2017 12:35 AM2017-02-18T00:35:48+5:302017-02-18T00:36:02+5:30
नोटाबंदी : धनादेश वटत नसल्याने औषधोपचारासाठीही पैसे नाहीत
येवला : नोटाबंदीने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य अजूनही अडचणीत असून, राबराब राबून पिकविलेला शेतमाल विक्री केल्यानंतर त्याचा मोबदला धनादेशाने मिळतो. मात्र, महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटूनही धनादेश वटत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. तालुक्यातील अंतरवेली येथील शेतकरी राजेंद्र खोडके यांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री करून मिळालेला धनादेश बँक आॅफ महाराष्ट्रच्या येथील शाखेत दि. १३ जानेवारी रोजी जमा केला आहे. मात्र, एक महिना उलटूनही त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. खोडके यांना डोकेदुखीचा त्रास असल्याने नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. उपचारासाठी पैसे मिळत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. लासलगाव येथे संबंधित बँकेला विचारले असता तुमचा धनादेश अद्यापपावेतो इकडे पोहोचलाच नाही, असे उत्तर मिळते तर संबंधित व्यापारी आम्ही तुम्हांला धनादेश दिला, आमचे काम संपले. तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क साधा, असे सांगितले जाते. त्यामुळे या शेतकऱ्याला औषधोपचार करणे मुस्कील झाले आहे. येवला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विकल्यानंतर त्याचा धनादेश एक महिना पुढील तारखेचा मिळतो. म्हणून तालुक्यातील असंख्य शेतकरी आपला माल लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीस नेत आहेत. तेथील व्यापारी माल विक्र ी केल्यानंतर त्याच तारखेचा धनादेश देत असल्याने शेतकऱ्याची सोय होते.
कांदा विक्रीचे धनादेश लासलगाव येथील राष्ट्रीयीकृत बँकांचे न देता मुद्दामहून सहकारी बँकांचे दिले जातात. त्या सहकारी बँकेची शाखा ज्या गावात आहे, त्या गावात धनादेश जमा केल्यानंतर रक्कम दुसऱ्या दिवशी खात्यावर जमा होते. मात्र, येवला येथील कोणत्याही बँक शाखेत धनादेश जमा केल्यानंतर महिना उलटूनही रक्कम खात्यावर जमा होत नाही. त्यामुळे शेतकरी त्रासले आहेत. परिसरातील शेतकऱ्यांचा गेल्या चार वर्षापासून सतत दुष्काळाचा सामना सुरू आहे. यावर्षी पावसाळा चांगला झाला. पिकेही जोमदार आली. उत्पादन चांगले निघाले. शेतमाल बाजार समितीत विक्री होण्याच्या वेळेसच नोटाबंदीचे सुलतानी संकट शेतकऱ्यांवर कोसळले. नोटाबंदीने शेतमालाचे भाव कमालीचे घसरले. उत्पादन खर्च निघेल असेही भाव मिळेना. निवडणूक प्रचारात उत्पादन खर्चावर आधारित भाव देऊन शेतकऱ्यांना साथ देण्यात येईल, अशा वल्गना करणाऱ्या शासनाने फक्त व्यापाऱ्यांना साथ दिली आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. शेतमाल विक्रीची रक्कम व्यापाऱ्यांनी चोवीस तासाच्या आत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा कायदा करण्यात यावा, अशी मागणीही केली जात आहे. (वार्ताहर)