बंडखोरी रोखण्याचे सर्वच पक्षांपुढे आव्हान
By admin | Published: February 12, 2017 12:17 AM2017-02-12T00:17:38+5:302017-02-12T00:17:53+5:30
जिल्हा परिषद निवडणूक : शिवसेना, राष्ट्रवादीत अधिक संख्या
नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी येत्या २१ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या मतदानाच्या दिवसापर्यंत सर्वच राजकीय पक्षांपुढे बंडखोरी रोखण्याचे आव्हान उभे राहिले आहे. यातील किती बंडखोर सोमवारी (दि.१३) माघार घेतात, यावरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी व कॉँग्रेस या सर्वच पक्षांपुढे बंडखोरांनी कडवे आव्हान उभे केल्याचे चित्र आहे. त्यातल्या त्यात शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात बंडखोरांची संख्या जास्तच आहे. शिवसेनेचा विचार केला तर नाशिक तालुक्यातील पळसे व एकलहरे गटात उमेदवारी नाकारल्याने तालुकाप्रमुखासह अनेकांनी बंडाचे निशाण फडकविले होते. मात्र पळसे व एकलहरे गटातून बहुतांश उमेदवारांना शांत करण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांना यश आलेले असले तरी, काही नाराजांची समजूत काढण्यासाठी थेट मातोश्रीला वाद मिटविण्याची भूमिका घ्यावी लागली आहे. तरीही एकलहरे गटातून शंकर धनवटे शिवसेना उमेदवाराच्या विरोधात अपक्ष लढण्याचे चित्र आहे.
निफाड तालुकाप्रमख उत्तम गडाख यांनाही तिकीट नाकारल्याने त्यांनीही अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली आहे. तीच बाब नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी गटातून शिवसेनेकडून ऐनवेळी प्रवेशकर्ते झालेल्या विजया अहेर यांना उमेदवारी मिळाल्याने पंचायत समिती सदस्य शशिकांत मोरे यांच्या पत्नी गायश्री शशिकांत मोरे अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत.
राष्ट्रवादीकडून जायखेडा गटातून उमेदवारी न मिळालेले बागलाण तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे यांनी त्यांच्या पत्नीला राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरोधात उभे केल्याने त्यांचे तालुकाध्यक्ष पद काढून घेण्यात आले आहे. निफाड तालुक्यातील देवगाव गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य हरिश्चंद्र भवर यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार अमृता पवार यांच्याविरोधात अपक्ष उमेदवारी करण्याची तयारी चालविली आहे.
येवल्यात माणिकराव शिंदे यांच्या मुलाला शाहूराजे शिंदे यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारीची तयारी केली होती. मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मध्यस्थीनंतर ते माघारी फिरणार असल्याचे बोलले जाते. (प्रतिनिधी)