सिन्नर तालुक्यात बंडोबांना थंड करण्याचे आव्हान
By admin | Published: February 10, 2017 11:09 PM2017-02-10T23:09:51+5:302017-02-10T23:10:04+5:30
सिन्नर तालुक्यात बंडोबांना थंड करण्याचे आव्हान
शैलेश कर्पे सिन्नर
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी येत्या २१ फेबु्रवारी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना व भाजपा यांच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त होती. त्यामुळे या पक्षांकडून अनेकांनी अर्ज दाखल केले. पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म नसल्याने सदर इच्छुकांना अपक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहेत. येत्या सोमवारी माघार असून, उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरीच्या तयारीत असलेल्या बंडोबांना थंड करण्याचे आव्हान आजी-माजी आमदारांसमोर उभे ठाकले आहे.
राज्यात भाजपा-सेना युतीत ज्या पद्धतीने विळ्या-भोपळ्याचे वैर निर्माण झाले आहे त्याच धर्तीवर सिन्नरचे राजकारण सुरु आहे. आमदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे शिवसेनेची तर माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे भाजपाच्या प्रचाराची सूत्रे आहेत. उमेदवारी देण्यापासून प्रचार यंत्रणा राबविण्यासह त्यांना निवडून आणण्यासाठी उभय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उमेदवारी देतांना वाजे व कोकाटे या दोघांनाही आपआपल्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याची मोठी कसरत करावी लागली. आता उमेदवाऱ्या जवळपास निश्चित झाल्या आहेत. मात्र पक्षाकडून इच्छुक म्हणून दाखल केलेले अर्ज आता अपक्ष म्हणून गणले गेले आहेत. या अपक्ष असलेल्या उमेदवारांच्या माघारीसाठी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. गटात किंवा गणात बंडखोरी झाल्यास पक्षाचा अधिकृत उमेदवार धोक्यात येण्याची भीती उभय पक्षाच्या नेत्यांना नक्कीच भेडसावत आहे.
पंचायत समितीच्या बारा जागांसाठी तब्बल ११०, तर जिल्हा परिषदेच्या सहा जागांसाठी ५४ उमेदवारी अर्ज आहेत. माघारीसाठी सोमवार (दि. १३) सकाळी ११ ते ३ असा केवळ चार तासांचा अवधी आहे. त्यामुळे या कालावधीत बंडखोरांची किंवा नाराजांची माघार होणे गरजेचे असणार आहे.
आपल्या कार्यकर्त्यांनी माघार घ्यावी व पक्षाच्या अधिकृत उमेदवारास धोका निर्माण होऊ नये यासाठी शिवसेना व भाजपा यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. नाराज इच्छुकांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी करण्याचे काम सुरू आहे.