नाशिक महापालिकेची खालावलेली आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे आव्हान
By admin | Published: February 20, 2015 01:32 AM2015-02-20T01:32:28+5:302015-02-20T01:32:59+5:30
नाशिक महापालिकेची खालावलेली आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे आव्हान
नाशिक : महापालिकेची खालावलेली आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे आव्हान स्वीकारत आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम हे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक शुक्रवारी (दि.२०) स्थायी समितीवर सादर करणार असून, उत्पन्नवाढीसाठी नवे नवे स्त्रोत शोधून काढतानाच घरपट्टी व पाणीपट्टीतही दरवाढीचे संकेत मिळत आहेत. महापालिकेच्या आयुक्तपदाची धुरा सांभाळणाऱ्या डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपल्या कारकिर्दीचे शंभर दिवस पूर्ण केले असून, प्रथमच नाशिक महापालिकेचे अंदाजपत्रक शुक्रवारी स्थायी समितीवर मांडणार आहेत. आयुक्तांनी यापूर्वीच अंदाजपत्रक रिअॅलॅस्टीक असेल, असे सूतोवाच केले असल्याने नाशिककरांना भव्यदिव्य स्वप्न दाखविण्याच्या भानगडीत आयुक्त पडणार नाहीत, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. सन २०१४-१५ चे अंदाजपत्रक त्यावेळचे आयुक्त संजय खंदारे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांसह १८७५ कोटी ६८ लाख रुपयांचे सादर केले होते. त्यात निव्वळ आयुक्तांचे अंदाजपत्रक १३०० कोटींच्या आसपास होते. यंदाही त्याच प्रमाणात अंदाजपत्रक असेल, असे गेडाम यांनी स्पष्ट केले आहे