उपक्रमशीलतेसोबतच कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान

By किरण अग्रवाल | Published: September 5, 2020 09:30 PM2020-09-05T21:30:02+5:302020-09-06T01:52:18+5:30

महसूल व पोलीस खात्यातील शीर्षस्थ नेतृत्वाचा बदल झाल्यानेसंबंधितांच्या नावीन्यपूर्ण कामाकाजाबाबत उत्सुकता आहे. विशेषत: कोरोनाचे संकट आटोक्यात येताना महसुलाचे व कायदा-सुव्यवस्थेचेही प्रश्न तीव्र होण्याची चिन्हे आहेत. आताच महापालिकेच्या उत्पन्नात तूट दिसू लागली असून, त्याचा परिणाम विकासावर होणे शक्य आहे. दरोडे, घरफोड्याही वाढल्या असून, पीपीई किट घालून चोरट्यांनी सुकामेवा लुटून नेल्याचे पहावयास मिळाले. तेव्हा नवीन अधिकाऱ्यांची वाटचाल परीक्षा पाहणारीच असणार आहे.

The challenge of maintaining law and order along with entrepreneurship | उपक्रमशीलतेसोबतच कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान

उपक्रमशीलतेसोबतच कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान

Next
ठळक मुद्देजनतेचा मित्र बनून कामकाज करताना गुंडगिरीबाबत असलेले भय मोडून काढण्याची अपेक्षा

सारांश

वेगळ्या विचारांचे व कल्पकता असलेले अधिकारी त्यांच्या नेहमीच्या कामातही अभिनवता आणतात म्हणून त्यांच्या वाट्यास लोकप्रियताही येते, त्यातून पारंपरिकतेला नवा चेहरा लाभून नियत कामगिरीची रेषा अधिक मोठी ओढली जाणे स्वाभाविक ठरते. नाशकातून बदलून गेलेले पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या बाबतीतही हाच अनुभव आला, त्यामुळे त्यांच्या जागी बदलून आलेल्या नूतन आयुक्तांपुढे हाच कित्ता गिरवत आपले वेगळेपण सिद्ध करण्याचे आव्हान राहणार आहे.

नाशिकचे महसूल आयुक्त, परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त व जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अशा पाचही अतिशय महत्त्वाच्या व जबाबदारीच्या नेतृत्वाचा खांदेपालट अवघ्या दोन-चार दिवसांच्या अंतराने घडून आला आहे. एकीकडे कोरोनाच्या संकटाशी लढाई सुरू असताना दुसरीकडे संपूर्ण राज्यातच शीर्षस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू असल्याने हे याच वेळी करणे गरजेचे होते का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत खरे; पण तो फार काही वादाचा मुद्दा ठरू शकत नाही. तेव्हा नवागतांचे स्वागत होताना त्यांच्या पुढील आव्हानांची चर्चा घडून येणे क्रमप्राप्त आहे.

महसूल आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताना राधाकृष्ण गमे यांनी विभागातील कोरोनावर लक्ष केंद्रित करण्याची भूमिका जाहीर केली आहे व ती बरोबरही आहे. गमे यांचा अनुभव व शांत स्वभाव पाहता ते नवीन जबाबदारी निश्चितच समर्थपणे निभावतील यात शंका नाही. विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदलून आलेले प्रतापराव दिघावकर हे तर जिल्ह्याचेच सुपुत्र असल्याने त्यांच्याकडून विशेष अपेक्षा आहेत, कारण बदलून गेलेले छेरिंग दोर्जे यांचे अस्तित्वच खरे तर नाशिककरांना कधी जाणवले नाही. महापालिकेचे नूतन आयुक्त कैलास जाधव हेदेखील नाशिकशी संबंधित म्हणजे येथे यापूर्वी काम केलेले आहेत, त्यामुळे येथल्या व्यवस्था, राजकारण व समाजकारणाशी ते परिचित आहेत. नवीन पोलीस अधीक्षकांची नियुक्ती अद्याप बाकी आहे, तर नवीन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय हे तसे नवीन असले तरी कार्यकुशलता व शिस्तशिरतेबाबत त्यांचाही लौकिक आहे. त्यामुळे या नवीन नेतृत्वात यापुढची नाशिकची वाटचाल कशी होते याबद्दलची उत्सुकता व अपेक्षा वाढून जाणे क्रमप्राप्त ठरले आहे.

विशेषत: महसुली व्यवस्थेखेरीज कायदा व सुव्यवस्थेचा विषय प्रत्येक ठिकाणी जिव्हाळ्याचा ठरत असतो. नाशिक शहरही ज्या वेगाने विस्तारते आहे व मुंबई, पुण्यापाठोपाठ प्रगतीच्या स्पर्धेत धावू पाहते आहे; त्यादृष्टीने येथील कायदा व सुव्यवस्था राखली जाणे दिवसेंदिवस आव्हानात्मक ठरत चालले आहे. अशात पोलीस आयुक्तपदी रवींद्रकुमार सिंगल आल्यानंतर त्यांनी मोठ्या कुशलतेने ही परिस्थिती हाताळली. प्रभावी व परिणामकारक जनसंपर्काबरोबरच कायद्याचा बडगा उगारून व नवनवीन उपक्रम राबवून त्यांनी कायदा-सुव्यवस्था नियंत्रणात आणली. त्यांच्यानंतर विश्वास नांगरे पाटील यांचे नेतृत्व लाभले. त्यांना अवघा दीड वर्षांचाच कार्यकाळ लाभला असला तरी त्यांनीही अनेक चांगले निर्णय घेतले. पोलिसिंगमधील सुस्तपणा दूर करण्यासाठी क्यूआर कोडची यंत्रणा उभारताना पोलिसांच्या कामाच्या वेळापत्रकात बदल करून रात्रीची शिफ्ट त्यांनी कार्यान्वित केली. पोलीस चौक्या स्मार्ट केल्या व टवाळखोरी रोखून महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथकांची नेमणूक केली. इतरही काही कामे आहेत, की ज्यामुळे पोलीस जनतेचा मित्र बनण्यास मदत झाली. आता हीच रेषा उंचावण्यासाठी दीपक पाण्डेय यांची कसोटी लागणार आहे.

पाण्डेय यांच्यासमोरील प्राधान्याचे विषय...


आगामी काळात नाशिक पोलीस आयुक्तालयाची हद्दवाढ अपेक्षित आहे. कमी मनुष्यबळात मोठे क्षेत्र सांभाळावे लागणार आहे. मुंबई ठाण्यातून तडीपार केलेल्यांचा नाशकात होणारा वावर, स्थानिक गुंडगिरी म्हणजे टोळीदादांचा उच्छाद व त्यातून होणारे वाहनांच्या जाळपोळीसारखे प्रकार, किरकोळ कारणातून एकापाठोपाठ एक पडणारे खून, मंगळसूत्र खेचण्याच्या वाढलेल्या घटनांबरोबरच महिलांची धोक्यात आलेली सुरक्षितता आदीविषय नाशिककरांसाठी महत्त्वाचे आहेत. ट्रॅफिकचा विषयही जटिल होत आहे. तेव्हा नूतन आयुक्त पाण्डेय यांच्यासमोर सदरील विषय प्राधान्याचे आहेत.

Web Title: The challenge of maintaining law and order along with entrepreneurship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.