सेनेला बालेकिल्ला राखण्याचे आव्हान
By admin | Published: January 16, 2017 12:51 AM2017-01-16T00:51:01+5:302017-01-16T00:51:52+5:30
पळसे : शिवसेनेचा उमेदवार निवडून येण्याची परंपरा
गणेश धुरी नाशिक
नाशिक गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसला अनपेक्षित लाभ झालेल्या पळसे जिल्हा परिषद गटात यंदा जसे राष्ट्रवादी कॉँग्रेससमोर गट कायम राखण्याचे आव्हान आहे, तसेच आव्हान ते शिवसेनेसमोर पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या पळसे गटावर पुन्हा सत्ता मिळविण्याचे आहे. कारण गेल्या तीन पंचवार्षिकपासून येथून शिवसेनेचा उमेदवार निवडून येण्याची परंपरा आहे.
२००२ राजेंद्र तुंगार, त्यांच्या अकस्मात मृत्यूनंतर त्यांचे बंधू संजय तुंगार, त्यानंतर शिवसेनेचेच कैलास चौधरी व आता राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अलका साळुंखे माजीमंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या व तत्कालीन महापौर नयना घोलप यांच्या भगिनी दीपा घोलप यांना पराभूत करून निवडून आल्या आहेत. नाशिक सहकारी साखर कारखानाही याच गटात येत असल्याने सहकाराभोवती राजकारण फिरत असते. शिंदे, सिद्धप्रिंपी व पळसे या तीन मोठ्या गावांमध्ये गटाचा निकाल बदलविण्याची क्षमता आहे.
या तीनही गावांमधूनच विविध राजकीय पक्षाचे इच्छुक उमेदवारीसाठी तयार आहेत. या गटातून मागील वेळी माजीमंत्री तथा शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांची कन्या दीपा घोलप यांनी शिवसेनेकडून उमेदवारी केली होती. त्याचवेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून सर्वसामान्य असलेल्या अलका नंदकिशोर साळुंखे यांनी उमेदवारी केली.
या लढतीत माजीमंत्री कन्या बाजी मारतील, असे चित्र असतानाच अचानक अपक्षांच्या एण्ट्रीने शिवसेनेच्या विजयाचे गणित बदलले आणि चक्क शिवसेनेला पराभवाचे तोंड पहावे लागले. अपक्षांच्या एण्ट्रीमुळेच शिवसेनेला पराभव पाहावा लागल्याची चर्चा त्यावेळी होती. कारण पळसे गणातून अपक्ष कैलास चव्हाण निवडून आले होते. खरेदी- विक्री संघावर तसेच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून निवडून आलेले संजय तुंगार यांचे या गटावर
नेतृत्व असल्याचे त्यामुळे बोलले जाते. मात्र त्यांच्याबरोबरीनेच कार्पोरेट पंचायत समिती तसेच अत्याधुनिक तालुका क्रीडासंकुल, नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद््घाटन निवडणुकीपूर्वीच करून उपसभापती अनिल ढिकले यांनीही आपला या गटावर वरचष्मा राहील, याची काळजी घेतली आहे. त्यामुळे पळसे गटात आता शिवसेना बालेकिल्ला कायम राखते की भाजपा, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस या गटावर विजय मिळविण्यासाठी डोके वर काढतात, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.