रेल्वेने असे पेलले ऑक्सिजन वाहतुकीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:12 AM2021-04-26T04:12:51+5:302021-04-26T04:12:51+5:30

नाशिकरोड : राज्यात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा निर्माण झालेला तुटवडा पाहता विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन मागविण्यासाठी शासनाने रेल्वेची मदत घेतली. तब्बल ...

The challenge posed by the railways was to transport oxygen | रेल्वेने असे पेलले ऑक्सिजन वाहतुकीचे आव्हान

रेल्वेने असे पेलले ऑक्सिजन वाहतुकीचे आव्हान

Next

नाशिकरोड : राज्यात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा निर्माण झालेला तुटवडा पाहता विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन मागविण्यासाठी शासनाने रेल्वेची मदत घेतली. तब्बल साडे अठराशे किलोमीटरचा प्रवास काही तासांत पूर्ण करण्याचे आव्हान रेल्वेने पेलले. त्यासाठी त्यांना काही तासांतच नियोजन करावे लागले व अवघड परिस्थिती, धोके पत्करून रेल्वेने ही मोहीम फत्ते केली.

रेल्वेने ऑक्सिजन एक्सप्रेसची वाहतूक एक आव्हान म्हणून स्वीकारले आणि कळंबोली ते विझाग आणि विझाग ते नाशिकपर्यंत पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस यशस्वीरित्या चालविली. द्रवरूप मेडिकल ऑक्सिजन टँकरच्या वाहतुकीसाठी रेल्वेला विनंती करताच रेल्वेने विविध ठिकाणी त्वरित रॅम्प बनविले. मुंबई टीमने कळंबोली येथे फक्त २४ तासांत रॅम्प बनविण्याचे आव्हान यशस्वीपणे पार पाडले. रो-रो सेवेच्या वाहतुकीसाठी रेल्वेला घाट सेक्शन, रोड ओव्हर ब्रिज, बोगदे, वक्र मार्ग, प्लॅटफॉर्म कॅनोपीज, ओव्हर हेड इक्विपमेंट आदी ठिकाणी बाधा लक्षात घेऊन संपूर्ण मार्गाचा नकाशा तयार केला. कसारा घाटाचा विचार करता रेल्वेने वसईमार्गे वाहतुकीचा नकाशा तयार केला.

वाहतुकीत धोका पत्करला

ऑक्सिजन हे क्रायोजेनिक आणि घातक रसायन असल्याने, रेल्वेला अचानक वेग वाढविणे, कमी करणे हे टाळण्याच्या आवश्यकतेसह मध्येच दाब (प्रेशर) तपासणे आवश्यक असते. जेव्हा ते भरलेल्या अवस्थेत असते तेव्हा दाब वाढतो. तरीही रेल्वेने हे आव्हान स्वीकारले. लोकांना प्रशिक्षण दिले आणि विशिष्ट आकाराचे टँकर वसई, सुरत, भुसावळ, नागपूर मार्गे विझागमध्ये नेऊ शकले. कळंबोली ते विझाग मधील अंतर १८५० किलोमीटरहून अधिक आहे. ते या ट्रेनने ५० तासांत पूर्ण केले. १०० टनांपेक्षा जास्त एलएमओ (लिक्विड मेडिकल ऑक्सिजन) असलेले ७ टँकर १० तासांत लोड केले गेले आणि केवळ २१ तासांत नागपुरात परत आणले. उर्वरित ४ टँकर केवळ १२ तासांत नागपूरहून नाशिकला पोहोचले.

वेळेत बचत

लांब पल्ल्यांसाठी ऑक्सिजनची वाहतूक रेल्वे गाड्यांद्वारे रस्ते वाहतुकीपेक्षा जलद होते. रेल्वेमार्गाने वाहतुकीस २ दिवस तर रस्त्यामार्गे ३ दिवस लागतात. रेल्वेगाड्या २४ तास धावू शकतात, परंतु ट्रक चालकांना थांबा घेण्याची गरज असते. या टँकरच्या वेगवान वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडोर तयार केले गेले होते आणि हालचालींचे निरीक्षण सर्वोच्च पातळीवर केले गेले होते. गेल्या वर्षीही लॉकडाऊनमध्ये रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली आणि पुरवठा साखळी कायम ठेवली आणि आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्राची सेवा सुरू ठेवली.

Web Title: The challenge posed by the railways was to transport oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.